कार अपघातात गोव्यात नौदलाचे दोन अधिकारी ठार: एकजण गंभीर जखमी
By सूरज.नाईकपवार | Published: June 1, 2024 03:35 PM2024-06-01T15:35:39+5:302024-06-01T15:36:10+5:30
उपलब्ध माहितीनुसार ते तिघेही कारवार येथील सीबर्ड येथे कामाला होते. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली. यासंदर्भात पोलिस अधिक माहिती गोळा करीत आहेत.
मडगाव: नौदलाचे दोन अधिकारी गोव्यातील सासष्टी तालुक्यातील नुवे येथील बगलमार्गावर आज शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात घटनास्थळीच ठार झाले तर त्यांचा अन्य एक सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सदया बांबोळीतील गोमेकॉत उपचार चालू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. उपलब्ध माहितीनुसार ते तिघेही कारवार येथील सीबर्ड येथे कामाला होते. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली. यासंदर्भात पोलिस अधिक माहिती गोळा करीत आहेत.
स्वीफ्ट कारने ते तिघेही प्रवास करत होते. जो जखमी झाला आहे तो कार चालवित होता. तर त्याच्या सिटाशेजारी अन्य एकजण बसला होता तर तिसरा पाठीमागील सीटवर बसला होता. उत्तर गोव्यात ते आले होते तेथून परतीच्या प्रवासाला निघाताना पहाटे हा अपघात झाला. कार चालवित असल्याचा वाहनावरील ताबा सुटला व त्याने रस्ताशेजारील सिमेंट ब्लॉकला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही घटना पोलिसांना समजली. नंतर पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचानामा करुन नंतर पुढील कायदेशीर सोपास्कार केले.