बेती येथे दोन दुकानांना आग; साडेचार लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 04:34 PM2024-04-10T16:34:21+5:302024-04-10T16:35:40+5:30
सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी बाजूची काही दुकाने आगीत भस्मसात होण्यापासून वाचवली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : बेती येथे थोटेश्वर मंदिरानजीक मंगळवारी दोन दुकानांना आग लागून सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी बाजूची काही दुकाने आगीत भस्मसात होण्यापासून वाचवली.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बेती येथील दुकानांना आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलप्रमुख सलीम शेख, जवान सुंदर राऊळ, सचिन गावकर, रोहन सावंत, विदेश नाईक आणि चालक नीलेश गावडे हे घटनास्थळी पोहोचले. बेती येथील थोटेश्वर मंदिरानजीकच्या प्रमोद चोडणकर यांचे जनरल स्टोअर आणि धर्मराज यांच्या मोबाइल दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले; परंतु या आगीत चोडणकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे आणि धर्मराज यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाच्या सतर्कतेने या दुर्घटनेत बाजूची दुकाने आगीपासून बचावली. आग लागण्याचे नक्की कारण समजू शकले नाही.