हवालदारावर गाडी घालणाऱ्या दोघा संशयितांना अटक
By काशिराम म्हांबरे | Published: October 1, 2023 07:36 PM2023-10-01T19:36:37+5:302023-10-01T19:36:52+5:30
संशयित गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी आल्याची माहिती कळंगुट पोलिसांना उपलब्ध झाली होती.
काशीराम म्हांबरे, म्हापसा: ड्युटीवर असलेल्या कळंगुट पोलीस स्थानकावरील एका हवालदार विद्यानंद अमोणकर यांच्या अंगावर गाडी घालून त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. घडलेला प्रकार फिल्मी स्टाईलने करण्यात आला.
सुंदीप कुमार ( वय २६, रा. बंगळूर, मूळ आंद्रप्रदेश) आणि वसंत मडीवाल (वय ३२, कारवार कर्नाटक ) अशी त्या संशयिताची नावे आहेत. सदर घटना शुक्रवारी रात्री घडली होती.
संशयित गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी आल्याची माहिती कळंगुट पोलिसांना उपलब्ध झाली होती. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आलेला. पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल त्यांना लागली. हवालदार आमोणकर तसेच त्याचे सहकारी गाडीजवळ पोहचताच वसंत माडिवाल यांनी गाडीचा दरवाजा उघडून पळ काढला. तर गाडी चालवणारा संशयित संदीपकुमार याला पकडण्यासाठी आमोणकर गाडीजवळ गेले. त्याला पकडण्याच्या तयारीत आमोणकर असताना संदीपकुमार यांनी गाडी सुरु करुन मुद्दामहून गाडी रिव्हर्समध्ये आमोणकरांच्या अंगावर घातली. गाडीची धडक बसताच आमोणकर गाडीखाली आले. तसेच त्यांना त्याच अवस्थेत त्यांना फरफटत नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी घटना स्थळावरून गाडीतून पळ काढला. पोलिसांनी नंतर त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.
घडलेल्या प्रकारात हवालदार आमोणकर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला तसेच कमरेला जबर दुखापत झाली. त्यांना नंतर तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेआहे. घटना कळंगुट परिसरातील गौरावाडो येथे घडली. पुढील तपास कार्य निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे.