मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 04:33 PM2024-02-05T16:33:13+5:302024-02-05T16:33:33+5:30
पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संशयितांनी कोरगाव येथे पायी चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला होता.
पेडणे : पेठेचावाडा - कोरगाव येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही संशयितांना पेडणे पोलिसांनी अटक केली. नीरज गुप्ता (२२, रा. महाराजगंज, उत्तर प्रदेश) आणि तोतन संन्यासी (२८, रा. दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत. १ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता.
पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संशयितांनी कोरगाव येथे पायी चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर संशयित शेतातून पळून जाण्यात यशस्वी ठरले. घटनास्थळी सापडलेला चोरट्यांचा मोबाईल आणि चप्पल ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता. पेडणे पोलिसांनी संशयितांविरोधात भादंसं कलम ३७९, ३५६ अन्वये गुन्हा नोंद केला होता. यासंदर्भात तपास करताना तांत्रिक आणि मोबाइल क्रमांकावर पाळत ठेवण्यात आली. या पथकाने दोन्ही संशयितांचा शोध लावला आणि दोघांनाही अटक केली. पेडणे पोलिस उपाधीक्षक जीवबा दळवी व पोलिस अधीक्षक निधीन वालन्न यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक हरीश वायंगणकर तपास करत आहेत.