दिवाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी दक्षिण गोव्यात आलेले दोन पर्यटक बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 06:46 PM2018-11-12T18:46:59+5:302018-11-12T18:50:08+5:30
दिवाळीच्या सुट्टीला जोडून आलेल्या वीकेंडने दक्षिण गोव्यात दोन पर्यटकांचे बळी घेतले असून, पहिला मृत्यू शनिवारी सायंकाळी कुळे येथील दुधसागर धबधब्यावर झाला तर दुसरा मृत्यू काणकोण येथील पाळोळे समुद्रात झाला.
मडगाव: दिवाळीच्या सुट्टीला जोडून आलेल्या वीकेंडने दक्षिण गोव्यात दोन पर्यटकांचे बळी घेतले असून, पहिला मृत्यू शनिवारी सायंकाळी कुळे येथील दुधसागर धबधब्यावर झाला तर दुसरा मृत्यू काणकोण येथील पाळोळे समुद्रात झाला.
कुळे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, शनिवारी सायंकाळी 5 वा. पुण्यातील पिंपरी येथून आलेल्या सुरेशन नायर या 54 वर्षीय मूळ केरळचा असलेल्या इसमाचा बुडून मृत्यू झाला. सदर पर्यटक सुट्टीनिमित्त आपल्या कुटुंब व मित्र परिवारासह गोव्यात आला होता. दुधसागर धबधब्यावर पाण्यात पोहत असताना तो अचानक बुडाला. काही वेळाने त्याला पाण्यातून बाहेर काढून पिळये-धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत जाहीर केले. दुसरी घटना शनिवारीच पाळोळे येथे घडली. काणकोण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, बंगळुरु येथील अशोक एम. या 29 वर्षीय पर्यटकाला बुडून मृत्यू आला. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.