मोरजी किनाऱ्यावर दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 04:53 PM2023-11-16T16:53:40+5:302023-11-16T16:54:03+5:30
पुण्यातील फैज अहमद हे तीन दिवसांपूर्वी पत्नी फातिमा व दोन मुलांसह गोव्यात फिरायला आले होते.
निवृत्ती शिरोडकर
पेडणे : मोरजी - टेंबवाडा किनारी भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन पर्यटक बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना गुरुवारी घडली. यापैकी एकजण पुणे आणि एकजण बंगळुरू येथील आहे. फैज अहमद (वय ४७) आणि राजेश शर्मा (५०) अशी त्यांची नावे आहेत.
घटनास्थळी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील फैज अहमद हे तीन दिवसांपूर्वी पत्नी फातिमा व दोन मुलांसह गोव्यात फिरायला आले होते. मोरजी किनाऱ्यावरील एका रिसार्टमध्ये हे कुटुंब वास्तव्यास होते. गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास फैज हे समुद्रात उतरला. ते बुडत असल्याचे लक्षात आल्यावर किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी धाव घेतली. त्यांनी फैज यांना बाहेर काढले. त्यांना सुरुवातीला शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर तुये आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत मोरजी किनारी बंगळुरू येथून मित्रांसमवेत आलेल्या राजेश शर्मा यांचा बुडून मृत्यू झाला. ते बुडत असल्याचे लक्षात आल्यावर जीवरक्षकांनी त्यांना पेडणे आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथे राजेश यांना मृत घोषित करण्यात आले.