नगरच्या दोन पर्यटकांना गोव्यात पबमध्ये लुटले

By किशोर कुबल | Published: October 27, 2023 02:59 PM2023-10-27T14:59:41+5:302023-10-27T15:00:33+5:30

पबमध्ये नेणारे व मारहाण करुन लुटणारे परप्रातीय बाउंसर्स असल्याचे तक्रारदार पर्यटकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाने खळबळ माजली आहे.

Two tourists from the nagar were robbed in a pub in Goa | नगरच्या दोन पर्यटकांना गोव्यात पबमध्ये लुटले

नगरच्या दोन पर्यटकांना गोव्यात पबमध्ये लुटले

पणजी : गोव्यात पर्यटकांना लुटण्याचे प्रकार चालूच असून काल कळंगुटमध्ये एका पबमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरच्या दोन पर्यटकांना पबमध्ये नेऊन ३० हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला. मारहाण करुन त्यांना खोलीत बंद केले व त्यांच्याकडील पैसे लुटल्याचा आरोप आहे. पबमध्ये नेणारे व मारहाण करुन लुटणारे परप्रातीय बाउंसर्स असल्याचे तक्रारदार पर्यटकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाने खळबळ माजली आहे.

गोव्यात येणाय्रा पर्यटकांना पबमध्ये, बारमध्ये नेऊन लुटण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. मुली पुरवण्याचे आमिष दाखवूनही लुबाडण्याच्या घटना घडत आहेत. दलालांनी उच्छाद मांडला असून दहा दिवसांपुर्वी कळंगुट किनाय्रावरच कोलार, कर्नाटकच्या दोन पर्यटकांना खोलीत डांबून लुटले होते. त्यांच्याकडूनही युपीआय ट्रान्सेक्शन करायला भाग पाडून ३० हजार रुपये उकळण्यात आले होते. एस. सतीशकुमार शेट्टी (३९) या पर्यटकाच्या तक्रारीवरुन या प्रकरणात शाहरुख देवगिरी (वय २५, रा. हावेरी, कर्नाटक), सिरील डायस (४२, रा. गोवा) व अविनाश पटेल (३२. रा. दमण व दिव) या तिघांना अटक करुन पोलिस कोठडीत पाठवले होते.

कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, महाराष्ट्राच्या पर्यटकांना लुटण्याच्या प्रकरणात वेगळे आरोपी आहेत. आम्ही तक्रार नोंदवून घेत आहोत. ज्यांनी पर्यटकांना लुटले आहे त्यांना अटक केली जाईल. दरम्यान, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यानी अलीकडेच एका कार्यक्रमात पर्यटकांना लुटले जाण्याच्या घटनांबाबत नाराजीही व्यक्त केली होती.
 

Web Title: Two tourists from the nagar were robbed in a pub in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.