बळींची संख्या दोन, शोधाला विराम
By admin | Published: May 20, 2017 02:28 AM2017-05-20T02:28:29+5:302017-05-20T02:32:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कसावर्डे : येथील पूल कोसळून किमान तीस जणांना जलसमाधी मिळाली असावी, या शक्यतेत शुक्रवारी तथ्य आढळले नाही. या घटनेत
लोकमत न्यूज नेटवर्क
सावर्डे : येथील पूल कोसळून किमान तीस जणांना जलसमाधी मिळाली असावी, या शक्यतेत शुक्रवारी तथ्य आढळले नाही. या घटनेत मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह हाती लागले. अन्य कोणीही बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात तरी नोंद झालेली नाही. त्यामुळे शुक्रवारी १९ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शोधकार्य तात्पुरते थांबवले. त्यापूर्वी मृतांच्या शोधासाठी पुण्यातील नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स पथकाच्या साहाय्याने हा संपूर्ण परिसर पिंजून काढला.
गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती. त्यानंतर त्वरित शोधकार्याला सुरुवात झाली. रात्री नऊच्या सुमारास बसवराज मरेनवार याचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर उत्तररात्री अडीचच्या सुमारास नौदलाच्या जवानांना अजित प्रकाश एक्का (२१) याचा मृतदेह सापडला होता. हे दोघेही या कमकुवत लोखंडी पुलावर उभे असताना नदीत कोसळले होते. पहाटे तीनच्या सुमारास हे शोधकार्य थांबविले. शुक्रवारी सकाळी पुन्हा सुरू केलेले शोधकार्य सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालले. दुपारी तीनच्या सुमारास शोधकार्याची सूत्रे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स पथकाच्या जवानांनी आपल्या हाती घेतली. सायंकाळी पाचच्या सुमारास तटरक्षक दलाच्या जवानांना बसय्या संतोष वडाल याचा मृतदेह सापडला. याच व्यक्तीने आत्महत्या केल्याने त्याच्या शोध घेणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाहण्यासाठी लोकांनी या पुलावर गर्दी केल्यामुळे तो पूल कोसळला होता. मात्र, सरकारी सूत्रांप्रमाणे गुरुवारी रात्रीपर्यंत तीस जणांना सुखरूप बाहेर काढले होते.
शुक्रवारी सकाळी नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरद्वारेही शोधकार्य चालू होते. या हेलिकॉप्टरमधून संपूर्ण नदी परिसराची टेहळणी करण्यात आली. दुपारपर्यंत नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी शोधकार्य चालू ठेवले होते. मात्र, त्यांना यश आले नव्हते. केपे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शोधकार्य बंद केले. शोधकार्य जरी बंद केले असले तरी पुण्यातील नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्सचे पथक शनिवारपर्यंत सावर्डेतच राहाणार असे त्यांनी सांगितले.
गुरुवारी पहाटे तीनपर्यंत हे शोधकार्य चालू होते. हे शोधकार्य थांबवेपर्यंत घटनास्थळी दाखल झालेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर व खासदार नरेंद्र सावईकर तसेच सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकरही घटनास्थळी उपस्थित होते. रात्री उशिरा घटनास्थळी नौदलाचे पथक पोचल्यानंतर त्यांनी कटरच्या साहाय्याने खाली आलेल्या पुलाचा लोखंडी भाग कापून काढला.
त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने तो वर उचलला. तोपर्यंत पहाटेचे दोन वाजले होते.
त्यानंतर काही मिनिटांतच या पुलाखाली दबल्या गेलेल्या अजित प्रकाश एक्का याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांच्या आदेशाने रात्रीचे शोधकार्य थांबविले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी शोधकार्य चालू केले. त्यावेळी धारबांदोडाचे उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस, केपेचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, सांगेचे मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, सांगेचे गटविकास अधिकारी राजेश साखळकर, पोलीस निरीक्षक प्रवीण गावस, कुडचडेचे पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई, सावर्डेचे माजी सरपंच संजय नाईक शुक्रवारी सकाळी घटनास्थळी उपस्थित होते.