Goa: वार्का येथे कारने धडक दिल्याने दुचाकी चालक ठार: फरार कारचालकाला फाेंडयात पकडले
By सूरज.नाईकपवार | Published: February 8, 2024 11:45 AM2024-02-08T11:45:33+5:302024-02-08T11:45:55+5:30
Goa Accident News: नुवेगाळ वार्का येथे बुधवारी मध्यरात्री कारच्या धडकेने दुचाकीवरील एक युवक ठार झाला. आशित साहा (२९) असे मयताचे नाव असून, तो बाणवाली येथे रहात होता. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळाहून पोबारा केला होता. नंतर त्याला फोंडा पोलिस ठाण्यानजिक तेथील पोलिसांनी पकडले.
- सूरज नाईकपवार
मडगाव - नुवेगाळ वार्का येथे बुधवारी मध्यरात्री कारच्या धडकेने दुचाकीवरील एक युवक ठार झाला. आशित साहा (२९) असे मयताचे नाव असून, तो बाणवाली येथे रहात होता. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळाहून पोबारा केला होता. नंतर त्याला फोंडा पोलिस ठाण्यानजिक तेथील पोलिसांनी पकडले. राघवेंद्र परशुराम साळुके (२४) असे या संशयिताचे नाव असून, तो मूळ कर्नाटकातील बेळगाव येथील असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली.
मयत आशित हा पश्चिम बंगाल राज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या पत्ताची खातरजमा पोलिस सदया करीत आहेत. तो एका पंचतारांकीत हॉटेलात काम करीत होता. बुधवारी त्याची सुटटी होती.रात्री पावणे एकच्या दरम्यान तो दुचाकीवरुन वार्का येथून बाणावलीला जात होता तर इनोवा कार विरुध्द दिशेने येत होती. या कारची जोरदार धडक दुचाकीला बसली व आशित हा गंभीर जखमी झाला. त्याच स्थितीत त्याला सोडून कारचालकाने वाहनासह धूम ठोकली.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर व पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. अपघातस्थळी कारचे बंपर पडले होते. त्यावर वाहनाचा क्रमांक होता. पोलिसांनी लागलीच यासबंधी बिनातरी संदेश राज्यातील सर्व पोलिस ठाण्यात पाठवून दिले होते. सीमेवरील चेकनाक्यालाही सतर्क करण्यात आले होते.
संशयित कार चालकने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो कारवर चालक म्हणून काम करत आहे. त्याच्या मालकाने काहीजणांना माजोर्डा येथे सोडण्यास सांगितले होते. या कार चालकावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
जखमी आशितला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतदेह या इस्पितळातील शवागारात ठेवला आहे. मयत ज्या हॉटेलमध्ये कामाला होता तेथून त्याच्या कुटुंबीयाची माहिती पोलिस गोळा करीत आहेत. उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करीत आहेत.