म्हादई नदीत दोन युवकांचा बुडून मृत्यू
By Admin | Published: May 8, 2015 01:17 AM2015-05-08T01:17:25+5:302015-05-08T01:17:42+5:30
वाळपई : म्हादई नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संदेश विठ्ठल कुडसेकर, (वय ३९, रा. धावे-सत्तरी)
वाळपई : म्हादई नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संदेश विठ्ठल कुडसेकर, (वय ३९, रा. धावे-सत्तरी) याचा मृतदेह सोनाळ-सत्तरी येथे म्हादईच्या काठावर तरंगताना दिसला, तर सोनाळ-सत्तरीतच ‘मोवाचो गुणो’ या पर्यटनस्थळावर सहलीसाठी आलेल्या रोनक पिंटो, (वय २३, रा. पर्रा-बार्देस) याचा सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू म्हादई नदीवरच वेगवेगळ्या ठिकाणी झाला.
संदेश याचा मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर ग्रामस्थांनी वाळपई पोलिसांना माहिती दिली. संदेश बुधवारी आंघोळीसाठी म्हादई नदीत गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढला. संदेश विवाहित होता. तो आपल्या आई व पत्नीसह राहात होता.
‘मोवाचो गुणो’ या पर्यटनस्थळावर ९ जणांचा गट सहलीसाठी आला होता. आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने रोनक पिंटो हा पाण्यात बुडाला. त्यानंतर गावातील लोकांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला.
वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. संदेश याचा मृतदेह चिकित्सेनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, तर रोनक याचा मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला. रोनक हा व्यावसायिक होता. चार भावांत तो थोरला होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.(प्रतिनिधी)