गोव्यातील रायतळे येथे ट्रकने दुचाकीवरील दोन युवकांना चिरडले: दुपारी झाला अपघात
By सूरज.नाईकपवार | Published: February 16, 2024 06:27 PM2024-02-16T18:27:23+5:302024-02-16T18:27:41+5:30
जो ट्रक या अपघाताला कारणीभूत ठरला तो मयत तन्वेश याच्या काकाच्या मालकीचा होता.
मडगाव: गोव्यातील सासष्टी तालुक्यातील रायतळे कुडतरी येथे डांबर मिश्रीत खडी घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील दोन युवकांना चिरडले. मयत सावर्डे भागातील आहेत. आज शुक्रवारी दुपारी अपघाताची ही भीषण घटना घडली. तन्वेश नाईक (२१, टोनीनगर, सावर्डे) व श्रीकर नाईक (१९, आनंदवाडी सावर्डे ) अशी मयतांची नावे असून, ते एकमेकांचे जीवलग मित्र होते. जो ट्रक या अपघाताला कारणीभूत ठरला तो मयत तन्वेश याच्या काकाच्या मालकीचा होता. मयत श्रीकर हा सावर्डे पंचायतीचे माजी पंच निळकंट नाईक यांचा मुलगा आहे. या दोन्ही युवकांच्या अपघाती मृत्यमुळे सावर्डे भागात शोककळा पसरली असून, सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
मायणा कुडतरी पोलिसांनी अपघाताच्या घटनेची माहिती मिळाल्यानतंर संबधीत ठिकाणी जाउन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची सांतोण सावर्डे येथिल हॉटमिक्स प्रकल्पातील डांबर मिश्रीत खडी घेउन एक ट्रक चांदर मार्गे मडगावात जात होता तर एमपीटीतील कोळसा घेउन अन्य एक ट्रक सावर्डेच्या दिशेने जात हाेता तर दुचाकीवालेही मडगावातून सावर्डेच्या दिशेने जात होते.
रालोय येथे अरुंद रस्त्यावर दोन्ही ट्रक समोरासमोर आले असता, कोळसावाहू ट्रकचे डिस्क डांबरची वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या डिस्कला घासले. त्यामुळे त्या डांबरवाहू ट्रकच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व त्यांनी सरळ पुढून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. नंतर ट्रक सरळ शेतात कलंडला. ट्रकने दोन्ही युवकांना फरफटत नेले. या अपघाता ते दोघेही गंभीर जखमी होउन घटनास्थळी निपचित पडले होते. नंतर त्यांना येथील दक्षिण गोवा जिल्हास्तरीय इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.