दाबोळी विमानतळासमोरील उड्डाणपुलावरून कोसळून दोन तरुण ठार
By पंकज शेट्ये | Published: October 25, 2023 05:43 PM2023-10-25T17:43:44+5:302023-10-25T17:44:06+5:30
पॅटसन आणि प्रज्वल दोघे कर्नाटकचे असल्याची प्राथमिक माहिती
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या ‘ग्रेड सेप्रेटर’ उड्डाण पुलावर झालेल्या दुचाकी अपघातात दोन तरुण थेट महामार्गावर कोसळून ठार होण्याचा धक्कादायक अपघात बुधवारी घडला. या भीषण अपघातात पॅटसन रॉड्रिग्स (वय २४) याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या २७ वर्षीय प्रज्वल रॉड्रिग्स याचा इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. भरधाव वेगाने उड्डाण पुलावरून जाताना ताबा सुटून ही दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. या जबर धडकेनंतर पॅटसन आणि प्रज्वल दोघेही पुलावरून खालच्या महामार्गावर कोसळले. दोघीही होन्नावर (कर्नाटक) येथील असल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली.
वास्को पोलिसांनी सांगितले की, बुधवारी (दि. २५) दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा अपघात झाला. पॅटसन आणि प्रज्वल हे मोटरसायकलने (केए ४७ यू २९४०) दाबोळी विमानतळावर जाणाऱ्या ‘ग्रेड सेप्रेटर’ उड्डाण पुलावरून जात होते. भरधाव वेगाने जाताना वळणावर मोटरसायकलवरील ताबा सुटला. मोटारसायकल उड्डाण पुलाच्या कठड्यावर आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीवरुन दोघेही उड्डाणपुलाच्याखालच्या महामार्गावर कोसळले. तर दुचाकी उड्डाणपुलावरच पडली होती.
अपघात झाल्याचे पाहताच स्थानिकांनी धाव घेतली. त्वरील १०८ रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. रुग्णवाहिकेने चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यापूर्वीच पॅटसन रॉड्रिग्सचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातात गंभीर जखमी प्रज्वल याला पुढील उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. वास्को पोलिसांनी अपघाताचा आणि पॅटसन याच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवागृहात पाठवला. अपघातावेळी दुचाकी कोण चालवत होता त्याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.