पणजी महापौरपदाची माळ पुन्हा उदय मडकईकर यांच्या गळ्यात; उपमहापौरपदी वसंत आगशीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 09:02 PM2020-03-10T21:02:38+5:302020-03-10T21:04:30+5:30
महापौरपदासाठी मडकईकर आणि उपमहापौरपदासाठी आगशीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी सांगितले.
पणजी : गोव्यातील एकमेव पणजी महापालिकेच्या महापौरपदी पुन्हा उदय मडकईकर यांचीच वर्णी निश्चित झाली आहे. तर उपमहापौरपद वसंत आगशीकर यांना दिले जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या बुधवारी अखेरचा दिवस असून दोघेही बुधवारी अर्ज भरतील.पणजीचे भाजप आमदार बाबुश मोन्सेरात यांनी याबाबतची घोषणा केली. महापौरपदासाठी मडकईकर आणि उपमहापौरपदासाठी आगशीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी सांगितले.
३0 सदस्यीय महापालिकेत सुरेंद्र फुर्तादो व त्यांची पत्नी रुथ फुर्तादो वगळता तब्बल २८ नगरसेवकांचे संख्याबळ भाजपकडे आहे. आमदार बाबुश मोन्सेरात यांचे वर्चस्व असलेल्या या महापालिकेत बाबुश यांच्या आशीर्वादानेच महापौर, उपमहापौर ठरणार होता. मंगळवारी बाबुश यांनी ही नावे निश्चित झाल्याचे घोषित केले.
दोन्ही पदांसाठीचा कार्यकाळ एक वर्षाचा आहे. याआधी बाबुश यांनी सुरेंद्र फुर्तादो यांना सलग दोन कार्यकाळ महापौरपदी राहण्याची संधी दिली होती. त्याची पुनरावृत्ती आता मडकईकर यांच्याबाबतीत झाली आहे. मडकईकर यांना पुन: महापौरपद दिले जाईल.
गुरुवारी १२ रोजी सकाळी १0 वाजता अर्ज माघारीसाठी मुदत असून निवडणूक घ्यावी लागल्यास आयुक्त संजित रॉड्रिग्स हे निर्वाचन अधिकारी म्हणून निवडणूक घेतील. मात्र निवडणुकीची गरज भासणार नाही, असेच संकेत मिळत आहेत. बाबुश मोन्सेरात यांचा आशीर्वाद ज्याला लाभेल तोच महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज भरेल हे निश्चित होते. भाजपकडे मोठे संख्याबळ असल्याने बंडखोरीचीही शक्यता नाही.
दरम्यान, महापालिकेचे लांबणीवर टाकलेले अंदाजपत्रक येत्या सोमवारी १६ रोजी मांडले जाणार आहे. मडकईकर यांनाच हे बजेट मांडण्याची संधी मिळेल हे आता स्पष्ट झाले आहे.