महापौरपदासाठी उदय मडकईकर यांचे नाव, 15 नगरसेवकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 08:08 PM2018-02-28T20:08:13+5:302018-02-28T20:08:13+5:30
पणजी : येथील महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी येत्या दि. 15 मार्चर्पयत निवडणूक होणार आहे. सत्ताधारी सतरा सदस्यीय गटापैकी पंधरा नगरसेवकांनी बुधवारी सायंकाळी मिरामार येथील एका क्बलमध्ये बैठक घेतली व नगरसेवक उदय मडकईकर यांचे नाव महापौरपदासाठी उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. या गटाचे प्रमुख असलेले माजी मंत्री बाबूश मोन्सेरात हे अंतिम निर्णय घेणार आहेत.
महापौरपदी सध्या सुरेंद्र फुर्तादो हे आहेत. फुर्तादो व त्यांची नगरसेवक पत्नी वगळता अन्य पंधराही नगरसेवकांची बैठक पार पडली. उपमहापौर लता पारेख यांनीही या बैठकीत भाग घेतला. उपमहापौरपदासाठी यापूर्वी अस्मिता केरकर यांचे नाव ठरविण्यात आले आहे. महापौर बदलण्याचे गट प्रमुख मोन्सेरात यांनी ठरविले व पंधराही नगरसेवकांनी मिळून अगोदर महापौर पदासाठी एखादे नाव ठरवावे, अशी सूचना मोन्सेरात यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी मडकईकर यांचे नाव सूचविले. मोन्सेरात यांना हे नाव मान्य आहे की नाही ते शेवटी मोन्सेरात यांच्या निर्णयावरूनच कळून येईल पण महापौरपदावर सध्या तरी आणखी कुणी दावा केलेला नाही. मडकईकर यांचे नाव एकमताने ठरल्याचे काही नगरसेवकांनी लोकमतला सांगितले.
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी महापालिकेतील विरोधी भाजप गटाकडूनही आपला उमेदवार उभा केला जाणार आहे. उपमहापौरपदासाठीही भाजपचा उमेदवार असेल. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे सध्या आजारी असल्याने त्याना महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालताच आलेले नाही. पुंडलिक राऊत देसाई यांचे नाव भाजपच्या गटातून तूर्त ऐकू येत आहे. पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांना
राऊत देसाई हे महापौर झालेले हवे आहेत, अशी चर्चा भाजप समर्थक नगरसेवकांमध्ये सुरू आहे. मात्र महापौरपदासाठी भाजपमध्ये आणखीही एक-दोन नगरसेवक इच्छुक आहेत. तिस सदस्यीय पणजी महापालिकेत भाजपकडे एकूण तेरा नगरसेवकांचे संख्याबळ आहे. महापौर फुर्तादो व त्यांच्या पत्नीच्या मताला खूप महत्त्व आहे. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी जर महापालिकेत दोन्ही गटांकडे प्रत्येकी पंधरा नगरसेवक असे संख्याबळ झाले तर ड्रॉ काढून महापौर ठरवावे लागतील. मोन्सेरात यांची खेळी यशस्वी की अयशस्वी होईल ते प्रत्यक्ष निवडणुकीवेळीच कळेल. विद्यमान महापौर व उपमहापौरांची मुदत येत्या दि. 15 मार्चला संपुष्टात येत आहे.