गोव्यात संघ नेत्याच्या कन्येच्या लग्नाला उद्धव ठाकरे उपस्थित, पर्रीकर अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 08:17 PM2017-12-04T20:17:49+5:302017-12-04T20:18:16+5:30
पणजी : गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये झालेल्या मोठ्या बंडानंतर माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याशी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मैत्री जमली.
- सदगुरू पाटील
पणजी : गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये झालेल्या मोठ्या बंडानंतर माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याशी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मैत्री जमली. वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचसोबत शिवसेनेची युतीही झाली व ती अजून अबाधित आहे. उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत आज मुद्दाम गोव्यात आले व वेलिंगकर यांची कन्या गीता यांच्या विवाह सोहळ्य़ास ते उपस्थित
राहिले.
गोव्यात कधीच कुणाच्या विवाह सोहळ्य़ात भाग घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांना सहसा गोव्यात यावे लागले नव्हते. एखाद- दुसरा क्वचित अपवाद असावा. मात्र प्रा. वेलिंगकर यांच्याप्रती असलेल्या आदरापोटी ठाकरे गोव्यात दाखल झाले. त्यांनी वेलिंगकर यांच्या कन्येला व जावयास आशीर्वाद दिले. पणजीतील गोमंतक मराठा समाज सभागृहात हा विवाह सोहळा पार पडला.
गोव्यात प्राथमिक शिक्षणाचे माध्यम हे मराठी किंवा कोंकणी असेच असावे आणि इंग्रजी शाळांना सरकारने अनुदान देऊ नये या मुद्दय़ावरून प्रा. वेलिंगकर आणि त्यांच्या सहका:यांनी 2012 सालापूर्वी आंदोलन उभे केले होते. गोव्याच्या माजी मुख्यमंत्री स्व. शशिकला काकोडकर यांच्यासह अनेकांनी मिळून त्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचची स्थापना केली. माध्यमप्रश्नावरून निर्माण झालेल्या लाटेवर स्वार होत भाजप सत्तेवर आला पण इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करण्याचे आश्वासन पाळले गेले नाही. यामुळे प्रा. वेलिंगकर यांनी नव्याने भाषा सुरक्षा मंच व गोवा सुरक्षा मंचला घेऊन आंदोलन उभे केले. या आंदोलनाची धग भाजपला बसू लागली तेव्हा प्रा. वेलिंगकर यांच्याकडून गोवा संघचालकपद काढून घेतले जावे म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठी फुट पडली व 90 टक्क्यांपेक्षा जास्त संघ स्वयंसेवक वेलिंगकर यांच्यासोबत राहिले. नंतर गोवा सुरक्षा मंच वगैरे राजकीय पक्षाची स्थापना झाली व वेलिंगकर यांच्या ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शिवसेना, सुरक्षा मंच व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अशी युती घडून आली.
2017 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रा. वेलिंगकर यांनी भाजपला टीकेचे लक्ष्य बनविले. विद्यमान मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्यासह अनेक भाजप नेत्यांची निवडणुकीपूर्वीची विधाने आणि नंतरच्या भूमिका वेलिंगकर यांची लोकांसमोर आणल्या. या सगळ्य़ा घडामोडींमध्ये र्पीकर व वेलिंगकर यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला. ठाकरे व वेलिंगकर यांच्यात चांगले नाते निर्माण झाले. माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ भाजप नेते प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, माजी मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई, नरेश सावळ, भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे वगैरे सोमवारी विवाह सोहळ्य़ाला आले. मुख्यमंत्री र्पीकर मात्र पोहचले नाहीत. एरव्ही प्रत्येक चतुर्थीला र्पीकर हे वेलिंगकर यांच्या निवासस्थानी न चुकता जायचेच.