सोळाव्या शतकातील चर्चच्या वैभवावर अप्रतिम छायाचित्रांमधून उजेड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 08:07 PM2018-12-08T20:07:44+5:302018-12-08T20:08:00+5:30
गोव्यातील चारशेपैकी अनेक चर्चना भेट देऊन एकूण 21 चर्चशी निगडीत आतील व बाहेरील वास्तूकलेचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन कक्कर यांनी मांडले आहे.
पणजी : गोव्यात येणे म्हणजे केवळ मद्य पिणे असे पर्यटकांनी समजू नये. गोवा म्हणजे अध्यात्माचेही हब आहे. सोळाव्या व सतराव्या शतकातील वास्तूकलेचा उत्कृष्ट नमूना असलेल्या दिमाखदार चर्च इमारती म्हणजे गोव्याच्या आध्यात्मिक कोंदणातील हिरे आहेत याची प्रचिती महिला छायाचित्रकार पायल कक्कर यांच्याशी बोलताना व त्यांनी भरविलेले छायाचित्र प्रदर्शन पाहिल्यानंतर शनिवारी आली. गोव्यातील चारशेपैकी अनेक चर्चना भेट देऊन एकूण 21 चर्चशी निगडीत आतील व बाहेरील वास्तूकलेचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन कक्कर यांनी मांडले आहे. लॅटीनेट भारतीय स्टाईलमधील गोव्यातील चर्चेस जगात वेगळ्य़ा कशा ठरतात ते फोटोग्राफी पाहून सहज कळून येते.
जुनेगोवे येथे पुराणवास्तू संग्रहालयाच्या जागेत सेंट फ्रान्सिस ऑफ आस्सिीसी चर्चमध्ये कक्कर यांचे फाईन आर्ट डोक्युमेंटरी फोटोग्राफी प्रदर्शन भरले आहे. अनेक गोमंतकीयच तिथे पोहचलेले नाहीत पण रोज शेकडो पर्यटक या प्रदर्शनाला भेट देतात व प्रभावीत होतात. गोवाभरातील चर्चमधील सुबक, नेत्रदीपक व आकर्षक नक्षीकाम, कोरीवकाम व लाकूडकाम कक्कर यांनी फोटोग्राफीमध्ये टीपले आहे. केवळ जुनेगोवेच्या टोलेजंग अशा मोठय़ा चर्चेस लोकांना ठाऊक आहेत पण गोव्यातील विविध भागांमध्ये चारशे ते पाचशे वर्षाहून जुन्या चर्चमध्ये सौंदर्याचे व प्राचिन कलेचे मोठे भांडार आहे याची अनुभूती कक्कर यांची फोटोग्राफी पाहताच कळून येते. सेंट झेव्हियर्स व जिझस तसेच सांतामोनिका आदींच्या मोठय़ा प्रतिमा काही चर्चमध्ये आहेत. दिवाडी, साळगाव, सांतान-तळावली, रेईशमागूश, पोंबुर्पा, सांताक्रुझ आदी अनेक ठिकाणच्या चर्चमध्ये प्रवेश मिळवून तेथील सगळे वैभव कक्कर यांनी छायाचित्रांमध्ये टिपले आहे.
गोव्याचे कला व संस्कृती खात्याचे सचिव दौलतराव हवालदार व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत यांच्या सोबत लोकमतच्या प्रतिनिधीने शनिवारी या प्रदर्शनाला भेट दिली व कक्कर यांच्याशी संवाद साधला. गोव्यातील ािस्ती धर्मियांच्या चर्चेस व हिंदू धर्मियांची मंदिरे म्हणजे मोठा खजिना असून पर्यटकांच्या मनात गोव्याची चांगली प्रतिमा ठसविण्यासाठी हा खजिना मदतरुप ठरेल, असे कक्कर म्हणाल्या.