दप्तर हाती आले, मात्र तो गेला; पाचवीतील विद्यार्थ्याची दुर्दैवी अखेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 07:55 AM2024-10-18T07:55:33+5:302024-10-18T07:55:46+5:30
१७ तासांनी सापडला मृतदेह, या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : ओहोळातील पाण्याच्या प्रवाहात बुधवारी सायंकाळी वाहून गेलेल्या साईनगर तिस्क उसागव येथील ११ वर्षीय दर्शन संतोष दर्शन नार्वेकर नार्वेकर याचा मृतदेह काल, गुरुवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ओहोळ व खांडेपार नदीच्या संगमावर सापडला. अग्निशामक दलाच्या जवानांकडून तब्बल १७ तास दर्शनचा शोध सुरू होता. दरम्यान, दर्शन वाहून जात असल्याचे लक्षात आल्यावर सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या खांद्यावरील दप्तराला पकडून प्रवाहातून ओढण्याची शिकस्त केली. मात्र, दप्तर मित्राच्या हाती आले आणि दर्शनच्या जीवनाची दुर्दैवी अखेर झाली. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर बुधवारी रात्री फोंडा अग्निशमन दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी दर्शनचा शोध सुरू केला. ओहोळाच्या पाण्याला असलेला जोर व दाट अंधार यामुळे शोधकार्यात अडथळे आले. मध्यरात्रीपर्यंत तो सापडला नव्हता. शोधमोहिमेला पोलिस, स्थानिक ग्रामस्थ व पंच गोविंद परब-फात्रेकर आदींनी जवानांना सहकार्य केले.
गुरुवारी सकाळी धावशिरे साकवाकडून धाटवाडा एमआरएफपर्यंतच्या ओहोळाच्या पात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. पास्कॉल फार्मच्या मागील बाजूस असलेल्या ओहोळ व खांडेपार नदीच्या संगमावर बोटीतून जवानांनी शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी तिथे दर्शनचा मृतदेह तरंगताना सापडला. कोस्टल गार्डनेही शोध मोहिमेत भाग घेतला. दुर्घटनेची माहिती मिळताच दळवी हायस्कूलचे मुख्याध्यापक रूपेश कामत व इतर शिक्षक, कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी दर्शनच्या घरी भेट दिली. दरम्यान, यावेळी घटनास्थळी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यांच्याकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
डोळ्यादेखत झाला नाहीसा
साई नगरातील दर्शनच्या सोबत्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दर्शन पुढे चालत गेला होता. तर चौघे पाठीमागून चालत गप्पा मारत येत होते. दर्शन पाण्यात ओढला जाऊ लागल्यानंतर त्याने मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केली. चौघेही त्याच्या दिशेने धावले. जोरदार पाऊस सुरू होता असे मुलांनी सांगितले. दर्शन आपल्या डोळ्यादेखत वाहून गेल्याचे दिसताच चौघेही घाबरले. आरडाओरड करत आपण साई नगरात परतल्याचे मुलांनी संगितले.
एकुलता मुलगा गेला
दर्शन नार्वेकर हा भामई- पाळी येथील श्रीमती ताराबाई दळवी हायस्कूलमध्ये इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई व दोन मोठ्या बहिणी आहेत. त्याच्या वडिलांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले आहे.
आरोग्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. दर्शन याचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त वेदना देणारे आहे. त्या कुटुंबाचे अकल्पनीय नुकसान झाले आहे. या दुःखद काळात आवश्यक असलेली सर्व ती मदत त्यांना दिली जाईल, असे राणे यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पाणी वाढले अन्...
घटनास्थळी व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन बुधवारी सायंकाळी शिकवणी वर्ग संपवून साईनगर येथील आपल्या घरी परतत होता. दर्शन प्रवाहात सापडून वाहून जाऊ लागला. त्यावेळी एकाने त्याच्या खांद्यावरील दप्तर पकडून त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दप्तर दर्शनाच्या खांद्यावरून निसटून त्या मुलाच्या हातात आले.