समान नागरी कायदा; राणेंचा केंद्राला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 09:30 AM2023-06-29T09:30:17+5:302023-06-29T09:31:27+5:30
मोदी यांच्या या भूमिकेला आपला तात्त्विक पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा आणण्याचे सूतोवाच केल्यानंतर काल गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी मोदी यांच्या या भूमिकेला आपला तात्त्विक पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
गोव्यात समान नागरी कायदा गेली अनेक वर्षे आहे व यशस्वीपणे लागू आहे. त्यामुळे पूर्ण देशातही समान नागरी कायदा आणण्यास हरकत नसावी, असे राणे म्हणाले.
गोव्यात पोर्तुगीज काळापासून समान नागरी कायदा आहे. हिंदू- मुस्लिम व अन्य विविध धर्मिय येथे एकोप्याने राहतात. राणे यांच्या मते देशातही समान नागरी कायदा लागू केला तरी प्रश्न उपस्थित होण्याचे कारण नाही. कारण गोव्यासारख्या राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी यशस्वी झालेली आहे. समान नागरी कायदा हा सर्वांच्या हिताचाच आहे. पंतप्रधानांनी याविषयी जी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेचे आपण स्वागत करतो.
दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मात्र समान नागरी कायद्याच्या मोदींच्या भूमिकेला आक्षेप घेतला आहे. आम आदमी पक्षाने मात्र समान नागरी कायद्याला तात्त्विक पाठिंबा दिला आहे पण केंद्राने सर्वांशी सल्लामसलत करावी, असे आपने सूचविले आहे.