शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच गणवेश, रेनकोट!
By admin | Published: May 12, 2015 01:56 AM2015-05-12T01:56:50+5:302015-05-12T01:57:02+5:30
पणजी : शिक्षण क्षेत्रातील उणिवांची पुरती जाणीव असलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे यंदा विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट शैक्षणिक वर्षाच्या
पणजी : शिक्षण क्षेत्रातील उणिवांची पुरती जाणीव असलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे यंदा विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्राप्त होणार आहेत. त्यासंबंधीची ‘कुपन्स’ संबंधित खात्याला यापूर्वीच पाठविण्यात आली असून ३० मे पर्यंत ती सर्वत्र उपलब्ध होणार आहेत, जी दुकानामध्ये देऊन या वस्तू प्राप्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘लोकमत’ला आज ही माहिती दिली. ते म्हणाले, खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांनी प्रत्येक तालुक्यात दुकाने निवडून त्यांच्यामार्फत या वस्तू वितरित करण्यास सांगण्यात आले आहे. ही कुपन्स घेऊन दुकानात गेल्यानंतर पालकांना जर उंची वस्तू खरेदी करायच्या असतील तर फरक भरून त्या प्राप्त करू शकतील. ‘विद्यार्थ्यांना हव्या त्या आकाराचा गणवेश शिवून घेण्याचीसुद्धा मुभा राहील, एवढेच की त्यांना किमतीतील फरक भरावा लागेल’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांना यापूर्वीच या वस्तू प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारी कुपन्स पाठविण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: रस घेतल्यामुळे यंदा ती शाळा सुरू होण्यापूर्वीच प्राप्त होतील, ही दिलासा देणारी गोष्ट आहे.
पाठ्यपुस्तकातच रहदारी नियम
रस्ता अपघातास कारण होऊन मृत्युमुखी पडणारी मुले बहुतांश १८ ते ३० वयोगटातील असल्याचे आढळल्याने पाठ्यक्रमातच रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून उपाय योजण्याचे शिक्षणमंत्रिपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे.
लहानपणापासून त्यांच्या मनावर रस्ता सुरक्षेचे महत्त्व बिंबविले तर तेच उद्या पालकांवर उपाय योजण्यासाठी तगादा लावतील, असे सांगून स्कूटर सुरू करणाऱ्या आई-वडिलांनाच मुले हेल्मेट देऊ लागली तर त्याचा विधायक परिणाम होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘अशा शिक्षणामुळे मुलेच आपल्या पालकांना ‘सीट बेल्ट’ लावण्याचा घोशा लावतील.’
आता रहदारीविषयक नियम सक्तीचे करण्यासाठी रस्त्यारस्त्यांवर सीसीटीव्ही लावण्यास पर्याय राहिलेला नाही. रहदारीचे नियम तोडणारा वाहनचालक आपल्याबरोबर इतरांचेही जीव धोक्यात आणीत असतो, तेव्हा अशा लोकांना आता कडक शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
(विशेष प्रतिनिधी)