'अखंडित 24 तास वीजपुरवठा नाही, तोपर्यंत वीज दरवाढ नाहीच'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 09:37 PM2020-01-14T21:37:34+5:302020-01-14T21:38:10+5:30
ते म्हणाले की, ‘वरील उपकेंद्रांसाठी प्रत्येकी 140 कोटी रुपये खर्च येणार होता.
पणजी : वेर्णा आणि तुयें येथे वीज उपकेंद्र उभारण्याचा नाद सरकारने सोडला आहे. साळगांव येथील नियोजित मानवरहित उपकेंद्रासाठी मात्र येत्या अडीच महिन्यात निविदा काढल्या जातील. येत्या मे महिन्यापर्यंत साळगांवसह आसगांव, कांदोळी, कळंगुट, शिवोली, हणजुण भागाची विजेची ९५ टक्के समस्या निकालात येईल, असा दावा वीजमंत्री निलेश काब्राल यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत काब्राल म्हणाले की, २010 साली कुंकळ्ळी येथे वीज उपकेंद्र उभारले. मात्र, केवळ 30 टक्के वापर झाला. नवी उपकेंद्रे उभारण्यापेक्षा सध्या अस्तित्त्वात असलेली यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जाईल. वेर्ला, काणका येथे भूमिगत वीज वाहिन्या लवकरच विद्युतभारित केल्या जातील.
ते म्हणाले की, ‘वरील उपकेंद्रांसाठी प्रत्येकी 140 कोटी रुपये खर्च येणार होता. हा खर्च सध्या तरी सरकारच्या आवाक्याबाहेरचा आहे. कुंकळ्ळीचे उदाहरण पाहता ही नियोजित उपकेंद्रे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. थिवी उपकेंद्राला गरज असल्याने कुंकळ्ळीहून 50 एमव्हीए ट्रान्स्फॉर्मर थिवीला आणला जाईल. याशिवाय या उपकेंद्रावक अतिरिक्त 42 एमव्हीए लोड निर्मिती होईल. पुढील अडीच महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल.
वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीसाठी पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे काब्राल म्हणाले. बोगदा, वास्को येथे 33 बाय 11 केव्हीचे दोन ट्रान्स्फॉमर्स येतील. या शिवाय 10 एमव्हीएचे दहा आणि 6 एमव्हीएचे ट्रान्स्फॉर्मर्सही मागविले जातील. फोंडा येथील वीज उपकेंद्र 50 वर्षे जुने आहे. या उपकेंद्रासह आणखी काही उपकेंद्रांचा दर्जाही वाढविला जाईल, अशी माहिती काब्राल यांनी दिली. मुख्य अभियंता केणी, खात्याचे कार्यकारी अभियंता, साहाय्यक अभियंता यांची बैठक घेऊन काब्राल यांनी त्यांच्याकडून वीज स्थितीचा आढावा घेतला.
24 तास अखंडित वीज पुरवठा होत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांसाठी दरवाढ नाहीच : काब्राल
सरकार 24 तास अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत दरवाढीची कोणतीही झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसणार नाही, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. येत्या 5 फेब्रुवारी रोजी संयुक्त वीज नियमन आयोगासमोर सुनावणी आहे. केवळ औद्योगिक वापरासाठीचे दर वाढतील. सर्वसामान्यांना झळ पोचणार नाही. घरगुती वापरासाठीच्या विजेचा दर एक पैसाही वाढलेला नाही, असे ते म्हणाले.
काब्राल म्हणाले की, ‘वीज दरांच्या बाबतीत काही चुका होत्या त्या दुरुस्त केलेल्या आहेत. 400 पेक्षा अधिक युनिट वापरल्यास युनिटमागे कमी आकारणी होत होती ती आता वाढविण्यात आली आहे. सध्या घरगुती वापरासाठीच्या विजेसाठी 0 ते 100 युनिटसाठी 1 रुपया 40 पैसे प्रती युनिट, 101 ते 200 युनिटकरिता 2 रुपये 10 पैसे प्रती युनिट, 201 ते 300 युनिटसाठी प्रती युनिट 2 रुपये 65 पैसे, 301 ते 400 युनिटकरीता प्रती युनिट 3 रुपये 45 पैसे आकारणी केली जाते. यात कोणताही बदल केलेला नाही. 401 व त्यापेक्षा अधिक युनिट झाल्यास ४ रुपये प्रती युनिट लागू होतील.