कोविडच्या आजारातून उठलेले केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक सोमवारी दिल्लीत कार्यालयात रुजू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 01:15 PM2020-10-23T13:15:15+5:302020-10-23T13:15:43+5:30
१२ सप्टेंबर रोजी श्रीपाद यांचा कोविड अहवाल पॉझिटिव आला. त्यानंतर दोनापॉल येथील खाजगी इस्पितळात त्यांनी उपचार घेतले.
पणजी : कोविडच्या आजारातून उठलेले केंद्रीय आयुषमंत्री तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे येत्या सोमवारी दिल्लीतील कार्यालयात रुजू होणार आहेत. गेले काही दिवस ते गोव्यात होते आणि येथील एका खासगी इस्पितळात कोविडसाठी उपचार घेऊन आता या आजारातून बरे झालेले आहेत.
१२ सप्टेंबर रोजी श्रीपाद यांचा कोविड अहवाल पॉझिटिव आला. त्यानंतर दोनापॉल येथील खाजगी इस्पितळात त्यांनी उपचार घेतले. त्यांच्यावर उपचारांसाठी दिल्लीहून एम्सचे डॉक्टरही गोव्यात आले होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोव्यातील आपल्या खाजगी कार्यालयातून ते कामकाज पहात होते.
श्रीपाद यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत आयुष्य आणि संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात येत्या सोमवारी २६ रोजी ते रुजू होणार आहेत. गोव्यातून दिल्लीला प्रवास करण्यासाठी तसेच कार्यालयात रुजू होण्यासाठी डॉक्टरांनी फिटनेस दाखला दिलेला आहे. दोन्ही कार्यालयांमध्ये प्रत्येकी अर्धा दिवस ते असतील. काही महत्त्वाच्या फाइल्स हातावेगळ्या करायच्या आहेत, असे ते म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेणार काय? या प्रश्नावर श्रीपाद म्हणाले की, पक्षनेतृत्वाने तसे आपल्याला अजून काही सांगितले नाही. दिल्लीत गेल्यानंतरच काय ते समजेल. ते म्हणाले की, आणखी महिनाभरानंतर ते सर्वत्र प्रवास करू शकतील. रोज व्यायाम तसेच कोविडच्या आजारानंतर घ्यावयाची औषधेही चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुष्य मंत्रालयाची प्रतिबंधक औषधे घेऊनही कोविडची बाधा कशी झाली? असे विचारले असता ते म्हणाले की, कोविडच्या काळात इम्युनिटीच्या गोळ्या वांटपाच्या कार्यक्रमासाठी बऱ्याच ठिकाणी फिरलो. त्यामुळेच कोविडचे संक्रमण आपल्याला झाले.