सोनाली फोगाट प्रकरण सीबीआयकडे, केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं जाहीर
By किशोर कुबल | Published: September 12, 2022 09:00 PM2022-09-12T21:00:14+5:302022-09-12T21:01:44+5:30
हरयानातील खाप महापंचायतीने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती.
पणजी : अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट खून प्रकरण सीबीआयकडे देण्यात येत असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज सोमवारीच केंद्रीय गृहमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार असून हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देण्याची विनंती करणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. सायंकाळी गृह मंत्रालयाने प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यास परवानगी दिली. दिल्लीहून तसे जाहीरही करण्यात आले.
हरयानातील खाप महापंचायतीने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. अन्यथा २४ रोजी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. तसेच हायकोर्टात जाण्याचीही तयारी चालवली होती. प्रकरण सीबीआयकडे द्यावे यासाठी सर्व थरातून सरकारवर दबाव येत होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,‘ गोवा पोलिसांकडून उत्तम प्रकारे तपासकाम चालले होते. काही महत्त्वाचे धागेदोरेही पोलिसांना मिळाले होते. परंतु हरयानातील लोकांकडून तसेच सोनाली यांच्या कन्येकडून व नातलगांकडून हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यात यावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या मागणीस अनुसरुन हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची विनंती केंद्राकडे केली जाईल.’
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गोवा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत आली होती. माझा आमच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. परंतु वाढत्या मागणीमुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे लागत आहे. आजच मी विनंतीपत्र केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवणार आहे.’
टिक टॉक फेम तथा बीग बॉस रिअॅलिटी शो मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली फोगाट हिचा गेल्या महिन्यात हणजुण येथील एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. ड्रग्स पाजून तिला ठार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गोवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करुन एकूण पाच जणांना अटक केली. पैकी ज्या कर्लीस शॅकमध्ये तिला ड्रग्स पाजण्यात आले त्या शॅकचा मालक एडविन नुनीस हा तेवढा जामिनावर सुटलेला आहे. बाकी चारजण कोठडीत आहेत.