Shripad Naik : केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 03:23 PM2021-02-24T15:23:20+5:302021-02-24T15:33:02+5:30
Shripad Naik News : नाईक यांच्या कारला १२ जानेवारी रोजी कर्नाटकात गोकर्णनजीक भीषण अपघात झाला होता.
पणजी - केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांना गोमेकॉमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी अनुमती दिल्यास ८ मार्च रोजी संसदीय अधिवेशनातही भाग घेणार असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे. डिस्चार्ज मिळण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना नाईक म्हणाले की, 'मी काही दिवस विश्रांतीसाठी आडपई येथील माझ्या मूळ घरी राहणार असून नंतरच काही दिवसांनी सांपेद्र येथे येईन.
नाईक यांच्या मोटारीला १२ जानेवारी रोजी कर्नाटकात गोकर्णनजीक भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांची पत्नी विजया तसेच निजी सहाय्यक जागीच ठार झाले होते. अपघातात गंभीर जखमी झालेले श्रीपाद यांना त्याच रात्री वैद्यकीय उपचारांसाठी गोमेकॉत हलविण्यात आले होते तेव्हापासून सव्वा महिना ते गोमेकॉत उपचार घेत होते.डीन डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले की, नाईक यांची प्रकृती आता सुधारली असून घरी ते उपचार घेऊ शकतात.