केंद्रीय मंत्र्यांना गोव्यातील मच्छीमारांच्या प्रश्नांचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 09:02 PM2017-12-09T21:02:17+5:302017-12-09T21:03:03+5:30
कांपाल मैदानावर राज्यातील मच्छीमार खात्याच्यावतीने चार दिवसीय मत्स महोत्सव आयोजिला आहे. या महोत्सवाला शनिवारी तिसरा दिवशी केंद्रीय मंत्री सिंग यांनी भेट दिली.
पणजी - राज्यात सध्या मच्छीमार आणि शॅक्स मालकांचे विविध प्रश्न अजेंडयावर असताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांच्याकडून काही ठोस घोषणा मत्स्य महोत्सवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अशी काहीही घोषणा झाली नाही, यामुळे राज्यातील किनारी भागातील प्रश्नांची जाण केंद्रीय मंत्र्यांनाही नसावी का की ते जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्नही होत नसावा, असा सवाल उपस्थित होत आहे.
कांपाल मैदानावर राज्यातील मच्छीमार खात्याच्यावतीने चार दिवसीय मत्स महोत्सव आयोजिला आहे. या महोत्सवाला शनिवारी तिसरा दिवशी केंद्रीय मंत्री सिंग यांनी भेट दिली.
ओखी वादळामुळे राज्यातील किनारी भागातील सुमारे दोनशेच्या आसपास शॅक्सचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शॅक्स मालकांनी वादळाची पूर्व कल्पना राज्य सरकारने दिली नाही, असा आरोप केला आहे. या प्रश्नापूर्वी राज्यातील मच्छीमारांनी अनुदान आणि निर्यातीवर राज्य सरकार कर लावत असल्याने मच्छीमार मंत्री विनोद पालयेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही यावर अजिबात बोलण्याचे टाळले आहे.
गोव्यातील हे प्रश्न ताजे असतानाच राज्यात येऊन केंद्रीय मंत्री मत्स्य महोत्सवास भेट देतात. तेव्हा त्यांच्याकडून या प्रश्नांवर काही घोषणा किंवा तोडगा निघेल, अशी आशा असते. परंतु सिंग यांनी केंद्रीय योजना आणि त्याचा देशातील व गोव्यातील मच्छीमारांना झालेल्या फायद्याची आकडेवारी सांगण्यावर धन्यता मानली. जाता-जाता त्यांनी राज्य सरकारच्या या महोत्सवाचे कौतुकही करण्याची संधी सोडली नाही.
यावरून राज्यातील असे गंभीर प्रश्न सिंग यांनी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नसावा किंवा त्यांना या प्रश्नांची कल्पनाही राज्यातील नेत्यांनी येऊ न देण्याची पूर्ण काळजी घेतली असावी, असे दिसते. केंद्रातून संबंधित खात्याचा मंत्री येतो आणि स्थानिक प्रश्नावर बोलत नाही, म्हणजे नवलच करण्यासाखे आहे.