हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकत्र या: टी. राजासिंग; कुडचडेत बजरंग दल, विहिंपच्या सभेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2024 10:33 AM2024-12-09T10:33:16+5:302024-12-09T10:34:19+5:30
रविवारी कुडचडे येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : 'देशाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच जेव्हा एखाद्या हिंदूवर अन्याय होतो त्याला उत्तर देण्यासाठी आपण सज्ज हवे. संघटीत होऊन हिंदूंनी रक्षणासाठी पुढे यावे' असे प्रतिपादन हिंदूत्ववादी नेते टी. राजा सिंग यांनी केले.
रविवारी कुडचडे येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लढा देण्यासाठी गोव्यात लोक कितीही कमी असले तरी मनुष्यबळ महाराष्ट्र, कर्नाटकातून आणू' असे ते म्हणाले.
टी. राजासिंग म्हणाले की, 'जेव्हा धर्मांतर होत होते, तेव्हा ते रोखण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. ते आमचे दैवत आहेत. जर शिवाजी महाराज नसते तर हिंदू संपले असते. आज तशीच स्थिती आहे. बजरंग दल आहे म्हणून हिंदू आहे. बजरंग दलाच्या कामामुळेच गोमाता जीवंत आहेत. आधी हिंदू बना आणि मग राजकारणी व्हा असे आमचे म्हणणे आहे. धर्माचे रक्षण करायचे असेल तर विश्व हिंदू परिषदेत सहभागी व्हा.' दरम्यान, दुपारी तीन वाजता तिस्क सावर्डेपासून २८०० गणवेशधारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विराट शौर्य संचलन केले. पारंपरिक समई प्रज्वलित करून 'हो जाओ तैयार साथियो...' या गीताने व शिगमोत्सवातील रोमटामेळ तथा ढोल ताशांच्या गजरात कार्यक्रमाची सुरवात झाली. राजेंद्र पवार, मोहन आमशेकर, संकेत आर्सेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भगवदगीता पूजन करण्यात आले. 'दंड व खङ्ग प्रतिक्षित प्रयोग' करण्यात आला.
राजेंद्र पवार म्हणाले, 'हिंदू समाजाने संघटीत होऊन एकत्र येण्याचे गरज आहे. बजरंग दल मेक इन इंडियाचे काम करीत आहे. सेवा, सुरक्षा आणि संस्कृती टिकवायचे हा बजरंग दलाचा नारा आहे. मोहन आमशेकर म्हणाले की, 'राम मंदिराची स्थापना झाली आणि आमचे संकट दूर झाले आहे. दुर्गा वाहिनीचे काम प्रत्येकाने करायला पाहिजे. आत्मरक्षणासाठी आमच्याकडे शस्त्र पाहिजे. जोपर्यंत आम्ही संघटीत होत नाही, तोपर्यंत अन्याय होत राहील. संकेत आर्सेकर म्हणाले की, 'हिंदू टिकून राहण्यासाठी संघटन गरजेचे आहे.
रक्षणासाठी हिंदूंनी शस्त्रविद्या शिकावी
टी. राजासिंग म्हणाले की, 'आज अनेक घरांत रामायण, भगवतगीता पुस्तके पहायला मिळत नाही हे आमचे दुर्दैव आहे. भारतात मुस्लिम धर्माचा प्रसार करण्याचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. आज बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. ते बंद करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रौद्ररुप घेण्याची गरज आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी बजरंग दल तयार आहे. आपल्या रक्षणासाठी शस्त्रविद्या शिका.'