‘एक्सावेटर’च्या चाकाखाली सापडून ३७ वर्षीय व्यक्तीचा जागीच दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 10:24 PM2019-12-31T22:24:51+5:302019-12-31T22:33:57+5:30
दुचाकीवरून ‘एसीसी प्लांट’ मधून जात असताना खडी, माती इत्यादी वस्तू उपसणाऱ्या ‘एक्सावेटर’ च्या पुढच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
वास्को: दक्षिण गोव्यातील सडा, मुरगाव भागात राहणारा ३७ वर्षीय मृत्युंजय बारीक हा तरुण मंगळवारी (३१) संध्याकाळी दुचाकीवरून ‘एसीसी प्लांट’ मधून जात असताना खडी, माती इत्यादी वस्तू उपसणाऱ्या ‘एक्सावेटर’ च्या पुढच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. बोगदा, सडा येथे असलेल्या ‘एसीसी प्लांट’ च्या आतील रस्त्यावर सदर अपघात घडला असून ‘एक्सावेटर’ चालक राम गौडा (वय २४) याच्याविरुद्ध याबाबत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहीती मुरगाव पोलीस निरीक्षक प्रवीण पोवार यांनी दिली.
मुरगाव पोलीस निरीक्षक प्रवीण पोवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी ४.४५ च्या सुमारास सदर अपघात घडला. सडा येथे राहणारा मृत्युंजय हा तरुण ‘एक्टीव्हा’ दुचाकीने बोगदा, सडा येथील त्या ‘प्लांट’ च्या आत असलेल्या रस्त्यावरून जात असताना अचानक ‘एक्सावेटर’ च्या पुढच्या चाकाखाली दुचाकीसहीत पडल्यानंतर ‘एक्सावेटर’ चे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. हा अपघात घडल्याची माहीती पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला.
मृत्युंजयच्या दुचाकीची धडक त्या ‘एक्सावेटर’ ला बसल्यानंतर तो पुढच्या चाकाखाली सापडून मरण पोहोचला असावा असा प्रथम अंदाज पोलीसांनी व्यक्त केला असून या अपघाताचे नेमक्या कारणाचा तपास चालू आहे. अपघात घडलेल्या ठिकाणी असलेली खडी उपसून दुसºया ठिकाणी हलवण्याचे काम करण्यासाठी सदर ‘एक्सावेटर’ येथे आणण्यात आला होता अशी माहीती पोलीसांनी देऊन या वेळीच मृत्यूंजय चा अपघात घडून त्याचा अंत झाल्याचे निरीक्षक पोवार यांनी माहीतीत सांगितले.
मंगळवारी संध्याकाळी अपघात होऊन मरण पोचलेला मृत्यूंजय त्याच ‘एसीसी प्लांट’ च्या कंपनीत ‘स्टोर किपर’ म्हणून कामाला असल्याची माहीती निरीक्षक पोवार यांनी पुढे दिली. पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा करून मयत मृत्यूंजय याचा मृतदेह मडगाव येथील हॉस्पिसीयो इस्पितळाच्या शवगृहात पाठवलेला आहे. एक्सावेटर चालक राम गौडा (रा: सडा - मुरगाव) याच्याविरुद्ध पोलिसांनी भादस ३०४ (ए) कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहिती निरीक्षक पोवार यांनी दिली. सदर अपघाताचा अधिक तपास चालू आहे.