भाजपा मुख्यालयात 'मोदी की गॅरंटी' या संकल्पपत्राचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 09:22 AM2024-04-19T09:22:55+5:302024-04-19T09:24:35+5:30
'धेम्पो ब्रँड' भाजपपेक्षा मोठा नाही: मुख्यमंत्री सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : धेम्पो बँड भाजपपेक्षा मोठा आहे, असे जर विजय सरदेसाई यांना वाटत असेल तर तो त्यांचा चुकीचा समज आहे. धेम्पो ब्रँड भाजपपेक्षा मोठा नाही. भाजप ब्रँड सर्वांत मोठा असून, तो देशव्यापी आणि सर्वव्यापी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
भाजपच्या पणजीतील मुख्यालयात काल 'मोदी की गॅरंटी' या संकल्पपत्राचे अनावरण केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे सांगितले. यावेळी भाजपचे दोन्ही जिल्ह्यांतील उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेम्पे तसेच राज्यसभेचे खासदार सदानंदशेट तनावडे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पल्लवी धेम्पे या उमेदवार म्हणून भाजपची निवड आहे. त्यांच्या कामाची आणि लोकप्रियतेची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही उमेदवारी दिली आहे. धेम्पो उद्योगसमूह मागील अनेक वर्षांपासून गोव्यात यशस्वीपणे कार्यरत आहे आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम आहे. त्यामुळे धेम्पो समूहाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. परंतु याचा अर्थ धेम्पो ब्रेड हा भाजपपेक्षा मोठा आहे असे नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजपने दक्षिण गोव्याची उमेदवारी पल्लवी धेम्पे यांना जाहीर केल्यावर आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपवर टीका करताना भाजपला धेम्पो ब्रेड हा पक्षापेक्षा मोठा वाटत असल्याचे म्हटले होते. या त्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
वीज मोफत...
गोव्यात शून्य वीज बिल आकारण्याची सरकारची योजना असून ती लवकरच अमलात आणली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. वीज मोफत करून आम आदमी पक्षाच्या सरकारचा कित्ता आपण गिरवीत आहात का? असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की मोफत वीज म्हणजे सरकारी तिजोरीवर भार टाकून नव्हे तर सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याकडे सरकारचा प्रयत्न राहील. त्यामुळे सौर ऊर्जा निर्माण करून अतिरिक्त्त वीज परस्पर विकण्याची ही सोय मिळेल. त्यामुळे वीज बिल आटोक्यात आणणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.