'मणिपूर' वरून पुन्हा गदारोळ; सभापतींशी चर्चेचे मुख्यमंत्र्यांचे विरोधी आमदारांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 09:18 AM2023-08-02T09:18:26+5:302023-08-02T09:19:11+5:30
या प्रकरणात गोवा विधानसभेत चर्चा झालीच पाहिजे, असे सांगितले.
पणजी : विधानसभेत विरोधकांनी काल पुन्हा 'मणिपूर' मुद्यावर चर्चा करण्याची मागणी करत सभापतींच्या आसनाजवळ जाऊन विधानसभेचे कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. या मुद्यावर सभापतींशी चर्चा करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर विरोधकांनी माघार घेतली व ते आपल्या आसनांवर जाऊन बसले.
काल पुन्हा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह सर्व विरोधी आमदार सभापतींच्या आसनाजवळ धावले; परंतु, आजही सभापतींनी कामकाज तहकूब न करता शून्य तासाचे कामकाज चालू ठेवले. युरी आमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर प्रकरणाची दखल घेतल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून देत या प्रकरणात गोवा विधानसभेत चर्चा झालीच पाहिजे, असे सांगितले.
यावर सभापतींनी त्यांना शुक्रवारी खासगी विधेयकाच्या दिवशी हे प्रकरण विरोधक काढू शकतात, असे सांगितले; परंतु, शुक्रवारी या विषयावरील विधेयकाला परवानगी देतील, असे आश्वासन द्या, अशी मागणी केली. त्यावर सभापतींनी ते शुक्रवारी पाहून घेऊ, असे सांगितले. मात्र, यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सभापतींशी या विषयावर अगोदर चर्चा करूया, असे सांगितल्यावरच त्यांनी माघार घेतली.
प्रश्नकाळ संपताच विरोधक सभागृहात
सोमवारी विधानसभेत आमदाराशी गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेऊन सभापती रमेश तवडकर यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह सातही विरोधकांवर सोमवारी आणि मंगळवारी साडेबारा वाजेपर्यंत सभागृहात प्रवेश करण्यावर बंदी घातली होती. प्रश्नोत्तराचा तास साडेबाराला संपला व दुसऱ्याच क्षणी सातही आमदार पुन्हा काळ्या वेशात सभागृहात शिरले.
युरींनी शब्द मागे घेतले
विरोधक गोंधळ घालत असताना सभापती वारंवार सदस्यांना आपल्या आसनावर बसायला सांगत होते. एकदा तर युरी आलेमाव यांनी ना हांव बसना, असेही सांगितले. याला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तीव्र आक्षेप घेताना हा सभापतिपदाचा अवमान असल्याचे सांगितले. त्यानंतर युरींनी आपले शब्द मागे घेत असल्याचे सांगितले.