दक्षिण गोवा खासगी इस्पितळावरून गदारोळ! विरोधी आमदार पुन्हा संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 12:40 PM2024-07-26T12:40:57+5:302024-07-26T12:41:44+5:30
विधानसभेत मडगाव येथील नर्सिंग महाविद्यालयाचा विषय तापला, सभापतींच्या आसनासमोर धाव
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी न देण्याची मागणी करून विरोधी आमदारांनी काल, गुरुवारी विधानसभेत गदारोळ केला. हा प्रस्ताव रद्द करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी द्यावे, अशी विरोधकांची मागणी होती.
मुद्दा होता खासगी महाविद्यालयाचा. विरोधी सदस्यांनी सभापतींच्या पटलाजवळ धाव घेऊन खासगी वैद्यकीय महाविद्यालय होऊ न देण्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे कामकाजात व्यत्यय आला. मात्र सभापतींनी कामकाज तहकूब न करता सदस्यांना जागेवर जाऊन बसण्याची विनंती केली. त्यानंतर विरोधी आमदारांनी ही विनंती मान्य केल्यामळे कामकाज पुन्हा सुरू झाले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले की, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हृदयरोग विभाग आणि इतर महत्त्वाच्या सुविधा देण्याऐवजी दक्षिण गोव्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणण्यासाठी सरकार धडपडत आहे, याचा अर्थ काय? कोणत्याही परिस्थितीत खासगी वैद्यकीय महाविद्यालय होऊ दिले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाचे आमदार दिगंबर कामत यांनीही दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हृदय विभागासह इतर सोयीसुविधा पुरवण्याची मागणी केली.
डिकॉस्टा, वेंझी व्हिएगश यांनी द. गो. जिल्हा इस्पितळातून गोमेकॉसह खासगी इस्पितळात रुग्ण पाठविण्याचे प्रमाण वाढत आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक त्या साधनसुविधा नसल्यामुळेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दक्षिण गोव्यात खासगी वैद्यकी महाविद्यालयाच्या प्रस्तावाबद्दल विरोधक आक्रमक झाले असताना आमदार विजय सरदेसाई यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना केंद्रीय दक्षता खात्याच्या (सीव्हीसी) मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करण्याच्या भानगडीत पडू नका, असे सांगितले. तसे झाल्यास तुरुंगात जाण्याची वेळी येईल, असेही ते म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या मुद्द्यावर उत्तर देताना सांगितले की, विरोधकांकडून सुरू असलेला कांगावा हा अनाठाई आहे. कारण अजून खासगी वैद्यकीय महाविद्यालयासंबंधी निर्णय झालेचाच नाही. तसेच सरदेसाई यांच्या सीव्हीसी मार्गदर्शक तत्वांबाबत आपल्याला पुरेपूर माहिती आहे. सीव्हीसी मार्गदर्शक तत्याचे उल्लंघन आपण केलेले नाही आणि करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सर्व आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
'विनाकारण ओरड'
आरोग्यमंत्री विश्वजितराणे यांनी या विषयी उत्तर देताना विरोधकांचीही ओरड विनाकारण आहे. अजून खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला सरकारने मंजुरी दिलेली नाही, असे सांगितले. परंतु यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. मंत्रीमंडळाच्या बैठकीत नंतर मुख्यमंत्र्यांनीच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल जाहीर केले होते, याची आठवण आमदार विजय सरदेसाई यांनी करुन दिली.