वास्कोतील एका भागाने बिघडले गोव्याचे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:34 AM2020-06-15T04:34:04+5:302020-06-15T04:34:48+5:30
एका मांगोरहिलने गोव्यात होत्याचे नव्हते करून टाकले असून, आजच्या तारखेला राज्यात ४९० संसर्गित आहेत.
- वासुदेव पागी
पणजी : ग्रीन झोन म्हणून जाहीर झाल्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. धडाधड कोरोना संसर्गित आढळू लागल्यामुळे गोवा हादरला होता; परंतु रेल्वेमार्गे संसर्गित येण्याचे प्रकार जवळ जवळ बंद झाले आणि मांगोरहिल - वास्को येथे संसर्गाचा उद्रेक आढळून आला. एका मांगोरहिलने गोव्यात होत्याचे नव्हते करून टाकले असून, आजच्या तारखेला राज्यात ४९० संसर्गित आहेत.
आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि कदंब परिवहन महामंडळाचे कर्मचारीही संसर्गित झाले. संसर्गितांची संख्या अनपेक्षितपणे वाढल्यामुळे कोविड इस्पितळात नेमके कोणत्या प्रकारच्या संसर्गितांना ठेवावे व कोणत्या प्रकारच्या ठेवू नये यासाठी नवीन प्रणाली तयार करावी लागली. कोविड इस्पितळाची क्षमता केवळ २०० खाटांची आहे आणि संसर्गितांची संख्या क्षमतेपेक्षा दुप्पट झाल्यामुळे केवळ लक्षणे दिसणाऱ्या संसर्गितांनाच कोविड इस्पितळात ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. लक्षणे न दिसणा:या संसर्गितांना शिरोडा येथील कोविड निगा केंद्रात ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. संसर्गितांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोविड केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
गोव्यात कोविड संसर्गितांची संख्या शून्यावर आल्यानंतर गोवा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. तसेच ग्रीन झोन म्हणूनही घोषित करण्यात आले. हा ग्रीन झोनचा आनंद अधिक काळ उपभोगता आला नाही. गोव्यात रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्यानंतर संसर्गितांचा ओघच गोव्यात सुरू झाला. पहिल्या दिवशीच २० संसर्गित रुग्ण आढळले. ही संख्या नंतर ५० पर्यंत गेल्यानंतर रेल्वेतून संसर्गित येण्याचे प्रमाण जवळ जवळ शून्य झाले; परंतु नंतर मांगोरहिल येथे संसगार्चा झालेल्या उद्रेकामुळे गोव्यातील सर्वच अंदाज फोल ठरले. प्रत्येक दिवशी ५० च्या आसपास संसर्गित आढळू लागले.