चिंबल मशिदीत बोलावली तातडीची बैठक, २० जणांना अटक
By वासुदेव.पागी | Published: November 11, 2023 12:48 PM2023-11-11T12:48:18+5:302023-11-11T12:48:33+5:30
चिंबल येथील मशीदमध्ये शुक्रवारी तातडीची बैठक बोलावल्याचे कळताच जुने गोवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून २० जणांना अटक केली.
पणजी: चिंबल येथील मशीदमध्ये शुक्रवारी तातडीची बैठक बोलावल्याचे कळताच जुने गोवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून २० जणांना अटक केली. मशीद समितीतील दोन गटांत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावल्याची पोलिसांना ही कारवाई करावी लागली.
चिंबलच्या अंजुमन तोहिदूल मुस्लीमन मशीद समितीत काही मुद्यांवरून दोन गट पडले आहेत. या समितीचे अध्यक्ष असलेले रशिद बद्रापूर यांनी अलिकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले नव्हते. त्यानंतर मौनाली शेख हे अध्यक्ष बनले होते. शेख हे भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्षही आहेत. नवीन अध्यक्षांची कार्यपद्धती काहींना मान्य नसल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला होता. विशेषतः स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या नवीन समितीच्या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला आहे. कारण मशीद समितीच्या अधीनियमात स्वीकृत सदस्यांची तरतूद नाही असे त्यांचे म्हणणे आहे. नवीन अध्यक्षांवरही अविश्वास व्यक्त करून नव्याने निवडणुका घेण्याची मागणी काहींनी केली आहे. त्यामुळेच शुक्रवारी संध्याकाळी २ वाजता तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीत दोन्ही गटातील सदस्य उपस्थित असल्यामुळे वातावरणही बरेच तापले होते. बैठकीत तणाव निर्माण होत असल्याचे संकेत मिळताच याची खबर कुणी तरी जुने गोवे पोलिसांना देण्यात आली. जुने गोवे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन उभय गटातील १० -१० मिळून २० सदस्यांना अटक केली. जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेली कारवाई ही अनुचित प्रकार होऊ न नये यासाठी खबरदारी म्हणून केली होती. अटक करण्यात आलेल्यांना गोमेकॉत वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना उशिरा सोडण्यात आले.