उपाध्यक्षांचा जबाब घेणार अमेरिकेत
By admin | Published: August 31, 2015 01:38 AM2015-08-31T01:38:41+5:302015-08-31T01:52:49+5:30
पणजी : लुईस बर्जर कंपनीचे उपाध्यक्ष आणि लाच प्रकरणात
पणजी : लुईस बर्जर कंपनीचे उपाध्यक्ष आणि लाच प्रकरणात महत्त्वाची भूमिका असलेले जेम्स मॅकलंग यांचा अमेरिकेत जबाब घेण्यासाठी आणि कंपनीची कागदपत्रे मिळविण्यासाठी विनंती पत्र (लेटर रोगॅटरी) पाठविण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडून (क्राईम ब्रँच) विनंती पत्रासाठी तयारी सुरू झाली आहे. इंटरपोलच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
लुईस बर्जर कंपनीची जैका प्रकल्पाच्या संबंधातील कराराची कागदपत्रे गुन्हे अन्वेषणला हवी होती. तसेच या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेले आणि कंपनीचे माजी उपाध्यक्ष जेम्स मॅकलंगही हवे होते. त्यासाठी कंपनीच्या भारतातील गुडगाव येथील आणि हैदराबाद येथील कार्यालयात गुन्हे अन्वेषणकडून समन्स बजावले होते. तसेच न्यूजर्सी
येथील न्यायालयातून कागदपत्रे मागविण्यासाठी विनंती पत्रास मंजुरीचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविला होता. जवळ जवळ वीस दिवसांनी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.