गोव्याच्या किनारपट्टीतील रेव्ह पार्ट्यांमध्ये कॅटामिनचा वापर; आरोग्य मंत्र्यांकडून कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 02:10 PM2017-10-11T14:10:10+5:302017-10-11T14:10:58+5:30
गोव्याच्या किनारपट्टीत जिथे पर्यटन व्यवसाय चालतो अशा ठिकाणी रेव्ह पार्ट्यांमध्ये कॅटामिनचा वापर केला जातो.
पणजी - गोव्याच्या किनारपट्टीत जिथे पर्यटन व्यवसाय चालतो अशा ठिकाणी रेव्ह पार्ट्यांमध्ये कॅटामिनचा वापर केला जातो अशी माहिती मिळाल्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले. तसेच गोव्यातील ज्या औषधालयांकडून कॅटामिनची विक्री केली जाते त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई सुरू केली जाईल असा इशारा राणे यांनी दिला.
कॅटामिनमुळे पर्यटकांना गुंगी येत असते. अंमली पदार्थ घेतल्यासारखाच प्रभाव पडतो. किनारपट्टीत ज्या रेव्ह पार्ट्या चालतात, तिथे कॅटामिनचा वापर होतो. किनारपट्टीतील औषधालयांकडूनच कॅटामिनची विक्री होत असावी. कॅटामिन विक्रीवर बंदी आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली जाईल. त्यासाठी आम्ही नोटीस जारी केली आहे. प्रसंगी अशा औषधालयांचे परवाने रद्द करण्यात येतील असे मंत्री राणे यांनी सांगितले. आपली मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशीही याविषयी बोलणी झाली आहेत असे राणे यांनी सांगितले.
दरम्यान गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू झाला असून हजारो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. पोलिस गस्त सध्या किनारी भागांत वाढविण्यात आली आहे असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.