गोव्यात काजू उत्पादन वाढविण्यासाठी जैविक खताचा वापर
By admin | Published: July 2, 2016 05:58 AM2016-07-02T05:58:24+5:302016-07-02T05:58:24+5:30
गोव्यातील काजू उत्पादन स्थिर असल्यामुळे राज्य सरकारने उत्पादन वाढविण्यासाठी आता जैविक खताचा वापर करण्याचा निर्णय घेतला
पणजी : गोव्यातील काजू उत्पादन स्थिर असल्यामुळे राज्य सरकारने उत्पादन वाढविण्यासाठी आता जैविक खताचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना जैविक खते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
राज्याचे कृषी संचालक उल्हास पई काकोड यांनी सांगितले की, यंदा काजू उत्पादक वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. आम्ही शेतकऱ्यांना सबसिडीवर जैविक खत उपलब्ध करून देणार आहोत. उत्पादन वाढविण्यातही त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. राज्यात ५५ हजार हेक्टरवर काजूची शेती आहे.
काकोड यांनी सांगितले की, यंदा दीड हजार हेक्टर जमिनीवरील काजू बागांना पुरेल एवढे जैविक खत आम्ही उपलब्ध करून देऊ.
खताचे उत्पादन विभागामार्फतच केले जाईल. कृषी सहकारी
संस्थांच्या माध्यमातून हे खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाईल. लिंबोळी पेंड आणि रॉक फॉस्फेट ही खते प्रामुख्याने शेतकऱ्यांना दिली जातील. राज्यात काजूच्या शेतीत मशागतीचा अभाव आहे. त्यामुळे उत्पादन कमी आहे. (प्रतिनिधी)
>प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादन अपुरे; आफ्रिकेतून आयात
सध्या काजूच्या एका झाडापासून सुमारे एक ते दीड किलो काजू मिळतात. जैविक खताचा वापर केल्यास एका झाडापासून १५ ते २० किलो उत्पादित केले जाऊ शकतात. गोव्यात वर्षाला सुमारे २५ हजार टन काजूंचे उत्पादन होते. प्रक्रिया उद्योगासाठी हे उत्पादन अपुरे पडते. त्यासाठी अन्य राज्यांतून तसेच आफ्रिकी देशांतून काजू आणला जातो, असेही काकोड यांनी सांगितले.