"आपत्कालीन व्यवस्थापन कायदा भल्या कामासाठीही वापरा"; सरदेसाईंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 01:14 PM2022-07-12T13:14:07+5:302022-07-12T13:15:47+5:30
Goa News : विजय सरदेसाई यांनी रुडाल्फ यांच्या मताशी सहमती व्यक्त केली आणि सरकारला शक्य असल्यास सरकार कोणतेही काम तडीस नेऊ शकते असे सांगितले.
पणजी - सरकार काहीही करू शकते हे आतापर्यंत मोपा व इतर प्रकल्पाच्या बाबतीत आढळून आले आहे. आता आपत्कालीन व्यवस्थापन कायदा बोंडवाळ तळ्यालाही लावा असा खोचक सल्ला विजय सरदेसाई यांनी सरकारला दिला. सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडीस यांनी बोंडवाल तळ्याचा प्रश्न उपस्थित केला होता. ही तळी फुटली तर मोठी पूर आपत्ती येणार आहे. 100 हून अधिक लोक त्यात बळी पडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या तळ्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. या तळीच्या दुरुस्तीचे काम सुरूच झाले नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यावर उत्तर देताना जलस्रोत मंत्री सुभाष फळदेसी यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे काम सुरू होऊ शकले नाही असे सांगितले. त्या जागेवर कूळहक्क असलेली हिराबाई कवळेकर हिने दुरुस्ती कामाला न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे काम रखडले. खालच्या न्यायालयाच्या आदेशाला खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने खालच्या न्यायालयात पाठविले. खालच्या न्यायालयाने एक विशेष समिती करून सर्वेक्षण केले. सर्वेक्षण अहवाल न्यायालयाला सादर केला आहे. त्यामुळे सरकार तूर्त न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहे.
त्यावर रुडाल्फ बोलले की सरकारला हवे अस ल्यास सरकार काहीही करू शकते. ज्या पद्धतीने सरकारने मोपा अंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पुढे नेले त्या पद्धतीने बोंडवाळ तळ्याचे कामही करून टाका अशी मागणी केली. त्यावर मंत्री शिरोडकर हे उभे राहून सरकारला कायदे पाळूनच काम करावे लागते असे रुडाल्फ यांना समजावत होते, परंतु त्यावेळी विजय सरदेसाई यांनी रुडाल्फ यांच्या मताशी सहमती व्यक्त केली आणि सरकारला शक्य असल्यास सरकार कोणतेही काम तडीस नेऊ शकते असे सांगितले. बोंडवाल तळीची दुरुस्ती न केल्यास त्या ठिकाणी पूरदुर्घटना होवू शकते. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लावून हे काम करून घ्या असे सांगितले. हे सांगतानाच अशा भल्या कामासाठीही आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करा असा खोचक सल्लाही दिला.