पणजीवासीय खेळतात धुळीची होळी: उत्पल पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:00 PM2023-03-08T12:00:51+5:302023-03-08T12:01:49+5:30
जी-२० परिषदेसाठी पणजीत सुरू असलेली कामे घाईगडबडीत केली जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीचे नागरिक सध्या धुळीने होळी खेळत आहेत. ही कामे लवकर पूर्ण करावीत, अशी टीका उत्पल पर्रीकर यांनी केली आहे.
जी-२० परिषदेसाठी पणजीत सुरू असलेली कामे घाईगडबडीत केली जात आहेत. मात्र, ही कामे व्यवस्थित पूर्ण करावीत, म्हणजे लोकांना त्याचा त्रास होणार नाही, इतकीच मागणी करू शकतो, असे त्यांनी सांगितले. आझाद मैदान येथे रंगपंचमी खेळण्यासाठी आले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
पर्रीकर म्हणाले, की स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीचे सर्व रस्ते फोडून ठेवले आहेत. त्यामुळे प्रचंड धूळ निर्माण झाली आहे. यामुळे पणजीच्या लोकांना रंगांऐवजी धुळीने होळी खेळावी लागत आहे. कदाचित त्याचमुळे लोकसुद्धा रंगपंचमी साजरी करताना घरातून फारसे निघाले नाही. त्यामुळे पुढील वर्षी तरी रंगपंचमी रंगांनी खेळता यावी, धुळीने नव्हे अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा आहे. पणजीतील रस्ते फोडल्याने वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे त्या दुकानांना व्यावसायिकदृष्ट्या मोठा आर्थिक फटका बसत आहे. कोरोना काळात जी स्थिती निर्माण झाली होती, तीच आता स्मार्ट सिटीच्या कामांमुळे झाल्याची टीका पर्रीकर यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"