पणजीची वाट लागली, आमदार बदला; उत्पल पर्रीकर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:37 AM2024-01-05T08:37:54+5:302024-01-05T08:40:24+5:30
'स्मार्ट सिटी'वरून बाबूश मोन्सेरात यांच्यावर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पणजीचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम झाले आहेत. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे स्मार्ट सिटीची वाट लागली असून त्याचा त्रास पणजीकरांना भोगावा लागत आहे, असा आरोप उत्पल पर्रीकर यांनी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर केला. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी बदलण्याची सादही पणजीवासीयांना घातली.
काल, गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश चोपडेकर, दीपक म्हापसेकर, शुभदा धोंड व रेखा कांदे उपस्थित होत्या. स्मार्ट सिटी कामातील बेजबाबदारपणामुळे पणजीकरांसह इतरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, माजी नगरसेवकाच्या मुलाचा अपघातात बळी गेला, त्याला स्मार्ट सिटीचे अनियोजित कामच जबाबदार आहे; पण पणजीचे आमदार त्यांचे महापौर पुत्र याविषयी काहीच कारवाई करताना दिसत नाहीत.
पणजीवासीयांच्या सूचना हे लोकप्रतिनिधी ऐकून घेत नसल्याने लोकांचे फोन आम्हाला येत आहेत. हा आमदार स्मार्ट सिटीचा निधी निवडणुकीसाठी वापरत आहे. आतातरी पणजीवासीयांनी हे नेतृत्व बदलण्याची गरज आहे, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.
स्मार्ट सिटीच्या कामाचे ऑडिट करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्ज यांना निवेदन दिले असून त्यात विविध मागण्या केल्या आहेत. तसेच लवकर या प्रकल्पाच्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यांना पणजीकरांच्या सर्व समस्या सांगितल्या जातील, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
पक्षाशी निष्ठावंत राहिलो
पणजीत पोटनिवडणूक झाली तेव्हा मला पणजीवासीयांकडून निवडणूक लढविण्याचा दबाव येत होता; पण मी पक्षश्रेष्ठीच्या सांगण्यावरून निवडणूक लढविली नाही. त्यावेळी निवडणूक लढविण्याची मी तयारी दर्शविली असती तर मला अडवायची कोणाची हिंमत झाली नसती; पण दुसऱ्यावेळीही माझ्यावर तसेच आमच्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे हे कळल्यावर मी अपक्ष निवडणूक लढविली. अजूनही पणजीतील निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते हे माझ्यासोबत असून आम्ही कधीही बंडखोरी केलेली नाही, असेही उत्पल पर्रीकर म्हणाले.
महापौरांवर अविश्वास ठराव आणा
आमदार म्हणून पणजीचे प्रतिनिधित्व करताना मनपातही स्वतःच्या मुलाला महापौर म्हणून आणून बसविले आहे. मात्र, ते दोघेही आपल्या पदाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे विरोधी नगरसेवक तसेच सत्ताधारी नगरसेवकांनी पणजीवासीयांसाठी एकत्र येत महापौरांवर अविश्वास ठराव आणणे गरजेचे आहे. बाबूश यांच्या दबावाला बळी न पडता पणजीत अयोग्य घडत आहे त्याला पाठिंबा देऊ नये, असे आवाहनही उत्पल पर्रीकरांनी नगरसेवकांना केले.