भाजपाकडून उत्पल पर्रीकर लढवणार पणजी विधानसभेची पोटनिवडणूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 07:37 PM2019-04-09T19:37:19+5:302019-04-09T19:38:41+5:30
मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक मंगळवारी जाहीर झाली असून, भाजपतर्फे उत्पल पर्रीकर हे पणजीतून पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता दाट बनली आहे.
पणजी - मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक मंगळवारी जाहीर झाली. येत्या 19 मे रोजी पणजीसाठी निवडणूक होत असून, 23 मे रोजी मतमोजणी केली जाईल. भाजपतर्फे उत्पल पर्रीकर हे पणजीतून पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता दाट बनली आहे.
पोटनिवडणुकीबाबतची अधिसूचना 22 एप्रिल रोजी जारी होणार आहे. त्याच दिवशी उमेदवारी अर्ज सादर होण्यास आरंभ होईल. अर्जाची छाननी 30 एप्रिल रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास 2 मे रोजी मुदत आहे. रविवारी 19 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. 23 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी तसेच शिरोडा, म्हापसा व मांद्रे मतदारसंघातीलही पोटनिवडणुकीची मतमोजणी ही 23 मे रोजीच आहे. लोकसभेसाठी मतदान मात्र दि. 23 एप्रिलला आहे.
पणजीत सुमारे 22 हजार 482 मतदार आहेत. त्यापैकी तेरा हजार मतदार हे बहुजन समाजातील आहेत. सुमारे तीन हजार सारस्वत समाजातील तर बाराशे ते दीड हजार मुस्लिम धर्मिय मतदार आहेत. सहा हजार मतदार हे ख्रिस्ती धर्मिय आहेत. भाजपतर्फे यापूर्वी दोनवेळा सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर हे पणजीत लढले व विजयी झाले. गेल्या पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ पणजीत काँग्रेस पक्ष कधी जिंकलेला नाही. माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या निधनामुळे पणजीत जी सहानुभूतीची स्थिती निर्माण झाली, त्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांचे मोठे पुत्र उत्पल यांना भाजपने तिकीट द्यावे असा आग्रह काही भाजप कार्यकर्ते तसेच काही नगरसेवकांनीही धरला आहे. काही कार्यकर्ते मात्र कुंकळ्ळ्य़ेकर हे अनुभवी असल्याने कुंकळ्ळ्य़ेकर यांनाच तिकीट द्यावे, असेही सूचवित आहेत. कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठका होत आहेत. उत्पल यांनी अजून आपण पोटनिवडणूक लढवीन असे जाहीर केलेले नाही पण तो लढेल, असे त्यांच्या परिचयाच्या अनेक भाजप कार्यकर्त्यांनी लोकमतला सांगितले. उत्पलना पणजी मतदारसंघ पूर्णपणे ठाऊक आहे, ते अनेकदा पणजीतील बहुतेक घरांमध्ये वडिलांसोबत फिरलेले आहेत, असे काही कार्यकत्र्यानी सांगितले.
बाबूश मोन्सेरात हे 2017 साली पणजीतील निवडणूक हरले आहेत. नंतरची पोटनिवडणूक त्यांनी लढवली नाही. आता ते गोवा फॉरवर्ड पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा पणजीतून अपक्ष लढू पाहत आहेत. आपला तसा निर्णय त्यांनी मंगळवारीही येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केला.