गोव्यात आता 'व्हॅक्सिन टुरिझम'?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 11:25 PM2021-05-21T23:25:05+5:302021-05-21T23:25:27+5:30
कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ तसेच देशातील अन्य राज्यांमधून काहीजण गोव्यात नोंदणी करीत असल्याने गोव्यात आक्षेप घेतला जात आहे.
पणजी : कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ तसेच देशातील अन्य राज्यांमधून काहीजण गोव्यात नोंदणी करीत असल्याने गोव्यात आक्षेप घेतला जात आहे. भूमिपुत्रांवरील अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठविणाऱ्या गोवा फॉरवर्ड या प्रादेशिक पक्षाने हा विषय उचलून धरला आहे. गोवा राज्य स्वतःच्या खर्चाने लसी खरेदी करीत असताना परप्रांतातून ' कोणीही यावे आणि टपली मारून जावे ' याला आमचा विरोध आहे असे पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी राज्य सरकारला स्पष्टपणे ठणकावले आहे.
राज्य लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांचे असे म्हणणे आहे की शेजारी राज्यातील अनेकांनी १८ ते ४४ वयोगटात ऑनलाइनच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी नोंदणी केली आणि गोव्याच्या कोट्यातील लस घेतलीही! हा विषय अत्यंत गंभीर आहे. आरोग्य खात्याने याविषयी राज्य सरकारला कल्पना दिलेली आहे. ज्या परप्रांतीय नागरिकांनी गोव्यात लस घेतली त्यांच्यावर कारवाई करा ,अशी विनंती आरोग्य खात्याने सरकारला केली असल्याचे डॉ. बोरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उघडपणे सांगितले आहे.
हाच धागा पकडून गोवा फॉरवर्डने हा विषय उचलून धरला आहे. कोविड महामारीच्या या काळात गोवा 'व्हॅक्सिन टुरिझम डेस्टिनेशन' ठरले आहे. गोव्याची ओळख पूर्वी किनारी पर्यटन तसेच ऐतिहासिक धार्मिक स्थळांपुरतीच मर्यादित होती. पर्यटकांना किनार्यांवरून राज्यातील अंतर्गत भागात नेण्यासाठी धबधबे, अभयारण्ये तसेच इतर गोष्टींचा आधार घेण्यात आला. 'हिंटरलॅंड टुरिझम' ही संकल्पना रुजू लागली. मध्यंतरी वैद्यकीय पर्यटनानेही गोव्यात पाळेमुळे रुजविली. पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आतापर्यंत गोवेकरांनी अनुभवले असतानाच आता लस घेण्यासाठी परप्रांतातून गोव्यात येणारे महाभाग पाहून 'व्हॅक्सिन टुरिझम'च्या या प्रकारावरून गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आरोग्य सचिवांना बरेच फैलावर घेतले आहे. कारण परवाच रात्री आरोग्य सचिव रवी धवन यांनी गोव्यात लस घेणाऱ्या परप्रांतीयांचे समर्थन केले होते.
आरोग्य सचिवांकडून समर्थन!
गोव्याचे आरोग्य सचिव रवी धवन म्हणाले होते की, केंद्राचे स्पष्ट आदेश आहेत, लसीकरणाच्या बाबतीत या राज्याचा नागरिक आणि त्या राज्याचा नागरिक असा भेदभाव करू नये. त्यामुळे त्यामुळे लसीकरणासाठी परप्रांतीयांनी नोंदणी केली तरी त्यास आक्षेप घेता येणार नाही. दरम्यान, परप्रांतीय गोव्यात येऊन कोविड प्रतिबंधक लस घेतात, हा विषय आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा बनला आहे.