कोकण मार्गावर आजपासून धावणार 'वंदे भारत'; PM मोदी दाखविणार हिरवा बावटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:39 AM2023-06-27T10:39:57+5:302023-06-27T10:40:25+5:30
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी हे या रेल्वेंचा शुभारंभ करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव:गोवा ते मुंबई मार्गावर धावणारी बहुचर्चित 'वंदे 'भारत' रेल्वे आज, मंगळवारपासून मडगावातून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वेस्थानकावरून एकाच वेळी गोवा मुंबई यासह एकूण पाच वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेना हिरवा कंदील दाखवणार आहेत.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी हे या रेल्वेंचा शुभारंभ करणार आहेत. ३ जून रोजी गोवा ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ होणार होता. मात्र ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे तो नंतर पुढे ढकलण्यात आला. आज मडगाव कोकण रेल्वे स्थानकात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, खासदार विनय तेंडुलकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन, आमदार दिगंबर कामत हे उपस्थित राहणार आहेत. गोवा मुंबई- वंदे भारत ही रेल्वे १२० किमी प्रतितास वेगाने धावत असून मडगाव ते मुंबईपर्यंतचे अंतर आठ तासांत पूर्ण करणार आहे.
१० तासांचा प्रवास...
वंदे भारत रेल्वेला पावसाळ्यातच मुंबई ते गोवा गाठण्यासाठी दहा तास लागणार आहेत. इतरवेळी ५८६ किमीचे अंतर आणि ११ स्थानकांवर थांबण्यासाठी ७.५० तास लागणार आहेत. सध्याच्या मार्गावरील वेगवान ट्रेनला हे अंतर कापण्यासाठी ८.५० तासांचा वेळ लागत आहे.
आठवड्यातून तीन दिवसच...
सुरुवातीला वंदे भारत मुंबई गोवा कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून तीनच दिवस चालविली जाणार आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे हा बदल असणार आहे. सामान्य वेळापत्रकानुसार वंदे भारत आठवड्याचे सहा दिवस या मार्गावर धावणार आहे. पावसाळी वेळापत्रकानुसार दरड कोसळण्याची शक्यता, दृष्यमान आदी कारणांमुळे कोकण रेल्वेवर वेगाचे लिमिट आहे. या लिमिटमुळे वंदे भारत ८० किमी प्रति तासच्या वेगापुढे धावू शकणार नाही.
वंदे भारत ही आठवड्यातून एकदाच म्हणजे शुक्रवारी धावणार नाही. तर पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबईहून सुटणारी वंदे भारत ही मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी निघणार आहे. वंदे भारत ही या तीन दिवसांना सीएम- एमटीवरून सकाळी ५.३२ वाजता सुटेल तर १० तासांनी ती मडगावला दुपारी साडेतीनला पोहोचणार आहे. गोव्यावरून परतीच्या प्रवासाला निघताना वंदे भारत ही आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुटणार आहे. मडगावहून ही ट्रेन दुपारी १२.२० वाजता सुटणार आहे. तर सीएमएमटीला ही ट्रेन रात्री १०.२५ वाजता पोहोचणार आहे. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.