वरद सिद्धीविनायक गणेशोत्सव म्हणजे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान; १९४६ पासून दरवर्षी २१ दिवस उत्सवाचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 09:12 AM2023-09-06T09:12:19+5:302023-09-06T09:13:23+5:30
सुरुवातीची काही वर्षे ७ दिवसांचे पूजन केले जात होते. त्यानंतर २१ दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसाः राज्यातील पहिला सार्वजनीक गणेशोत्सव होण्याचा मान प्राप्त झालेला पर्रा येथील वरद सिद्धीविनायक गणेशोत्सवाचे यंदाचे स्थापनेचे हे ७८ वे वर्षे आहे. याची स्थापना १९४६ मध्ये करण्यात आली होती. सर्व धर्मीयांसाठीचे श्रद्धा स्थान झाले आहे. उत्सवाचे दिवस वगळता इतरही दिवसात भक्तगण येत असतात. सर्वप्रकारच्या रुपात दान धर्म करण्यावर भर दिला जातो. ख्रिस्ती बांधवांकडून बक्षिसेही पुरस्कृत केली जातात.
सुरुवातीची काही वर्षे ७ दिवसांचे पूजन केले जात होते. त्यानंतर २१ दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला. कोविडचे वर्ष वगळता स्थापनेपासून ते आजपर्यंत इथे २१ दिवसांसाठीचे पूजन केले जाते. या ७८ वर्षाच्या वाटचालीत येथील मंदिर हे सर्व धर्मातील लोकांसाठी भाविकांसाठी भक्तीचे स्थान बनले आहे. चतुर्थीच्या दिवसातील उत्सवाचा काळ हा फक्त सणापुरता मर्यादीत न ठेवता सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून साजरा करण्याचे उद्दिष्ट समितीच्यावतिने ठेवले जाते. त्या दृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. धार्मिक कार्यक्रमांसोबत मुलांसाठी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जातो. सर्वांनी एकत्रित घेवून इथले कार्यक्रम साजरे केले जातात.
कार्यक्रमांचे आयोजन मंदिराच्या शेजारी उभारण्यात आलेल्या वातानुकूलीत अशा सभागृहातून केले जाते. २१ दिवसांचा उत्सवाच्या काळात देखाव्यावर किंवा इतर चुकीच्या प्रकारावर जास्त खर्च न करता अत्यंत साधेपणाने पण तेवढ्याच आकर्षकपणे उत्सव साजरा करुन वायफळ खर्च होणार नाही यावर भर दिला जातो. विविध माध्यमातून निधी गोळा केला जातो. गोळा झालेल्या निधीचा सामाजिक हिताच्या दृष्टीने वापर मंदिर ट्रस्टकडून करण्यात आला आहे.
गावातील लोकांना एकत्रित आणण्यासाठी या उत्सवाचा मूळ उद्देश आहे. सर्व एकमताने, समजूतीने समाजातील एकोपा राखून कार्य करीत असतात. गावात धार्मिक एकता राखण्याचे कार्य होते. समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजाला जास्तीच जास्त लाभ व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जातो. - प्रदीप मोरजकर, अध्यक्ष.