गोव्यात ग्रामस्वराज अभियानांतर्गत विविध उपक्रम,
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 09:21 PM2018-04-18T21:21:52+5:302018-04-18T21:21:52+5:30
गोव्यात ग्रामस्वराज अभियान सुरु झाले असून येत्या ५ मेपर्यंत ते चालणार आहे. येत्या २४ रोजी पंचायती राज दिनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी १0 वाजता सर्व पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा होतील.
पणजी - गोव्यात ग्रामस्वराज अभियान सुरु झाले असून येत्या ५ मेपर्यंत ते चालणार आहे. येत्या २४ रोजी पंचायती राज दिनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी १0 वाजता सर्व पंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा होतील.
या अभियानांतर्गत स्वच्छ भारत मोहीम, प्रधानमंत्री उजाला योजना, किसन कल्याण योजना, मिशन इंद्रधनुष्य, उज्ज्वल योजना आदी योजनांची जागृती करण्यात येणार आहे. पंचायत संचालक अजित पंचवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक सलोखा वृध्दिंगत व्हावा तसेच ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांपर्यंत पोचून सरकारच्या योजनांबद्दल त्यांचा प्रतिसाद घेणे, स्वच्छता, पंचायती राज संस्था बळकट करणे आदी विषय हाताळले जातील.
२४ एप्रिल रोजी पंचायती राज दिन साजरा केला जाईल. या दिवशी दुपारी बाल ग्रामसभा घेण्यात येतील. लहान मुलांशी संवाद साधला जाईल. पंचायत क्षेत्रांमध्ये प्रदर्शने भरवून चांगल्या प्रशासनाबाबत जागृती केली जाईल. काही यशोगाथाही उपस्थितांसमोर ठेवल्या जातील.
सर्व स्तरातील लोक या अभियानात सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न चालू आहेत. खास करुन महिला, स्वयंसाहाय्य गट यांनाही सहभागी केले जाईल. पंचायतींनी लोकसहभागातून प्रभावी ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंचायती राजच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी पाच वर्षांकरिता रोड मॅप तयार करावा, असे पंचायतींना सूचविण्यात आले आहे.
पिण्याचे स्वच्छ पाणी, सांडपाणी निचरा आदी विषय विशेष ग्रामसभांमध्ये चर्चेचा घेतले जाणार आहेत. ग्रामसभांमध्ये चर्चेसाठी ‘स्वप्नातलें गोंय’ ही संकल्पना असावी, असेही सूचविण्यात आले आहे.
खुल्या जागांचे सौंदर्यीकरण यालाही महत्त्व देण्यात आले आहे. पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यासाठी १0 हजार रुपये अनुदान देण्याची सूचना खात्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केली आहे.