भरधाव बस घुसली झोपड्यात; चौघे मजूर ठार
By पंकज शेट्ये | Published: May 26, 2024 12:44 PM2024-05-26T12:44:34+5:302024-05-26T12:45:48+5:30
त्या अपघातातून सुदैवाने बसमध्ये असलेले प्रवासी सुखरूप बचावल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली.
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : भरधाव वेगाने जाणारी खासगी प्रवासी बस शनिवारी मध्यरात्रीनंतर वेर्णा औद्योगिक वसाहतीतील रस्त्याच्या बाजूला असलेल्या मजुरांच्या झोपडीत घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात चार मजूर जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. झोपडीत घुसलेल्या बसचा चालक अपघातावेळी दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून तो जखमी झाल्याने त्याला इस्पितळात उपचारासाठी दाखल केला आहे. त्या अपघातातून सुदैवाने बसमध्ये असलेले प्रवासी सुखरूप बचावल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेले माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री 12.30 च्या दरम्यान वेर्णा औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावरून एक खाजगी प्रवासी बस वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन भरधाव वेगात जात होती. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झोपडीत घुसली. अपघातावेळी झोपडीत नऊ कामगार झोपलेले होते. बस झोपडीत घुसल्याने चार कामगार जागीच ठार झाले तर पाचजण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली. विनोद राजपूत (वय 60), राजेंद्र महातो (वय 60), रमेश मंडल (वय 60) आणि अनिल महातो (वय 35) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
ते सर्वजण बिहार येथील होते. अपघातावेळी बस चालक दारूच्या नशेत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली असून तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल केला आहे. अपघातात जखमी झालेले पाच कामगार 22 ते 25 वयोगटातील आहेत. अपघातात बसमधील प्रवासी सुदैवाने बचावले.