वाहनातील किंमती सामान चोरणाऱ्या टोळीला वास्को पोलीसांनी केले गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 08:46 PM2019-08-31T20:46:27+5:302019-08-31T20:46:44+5:30
अटक करण्यात आलेले पाचही संशयित १९ ते २१ वर्षीय वयोगटातील: चोरीला गेलेली ३ लाखाची मालमत्ता केली जप्त
वास्को: दाबोळी विमानतळ, बोगमाळो, सांत्रे अशा भागात उभ्या करून ठेवण्यात येणाºया चारचाकी तसेच दुचाकीत ठेवण्यात येणारे किंमती सामान चोरणाºया पाच जणाच्या टोळीला वास्को पोलीसांनी गजाआड करून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचे सामान जप्त केले आहे. पोलीसांनी अटक केलेल्या ह्या टोळीतील पाचही संशयित १९ ते २१ वयोगटातील युवक असून त्यांचा हात अनेक चोरी प्रकरणात असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.
वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे यांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी (दि.३०) उशिरा रात्री सदर पाच युवकांना गजाआड करून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकात रवी हरीजन (वय १९, रा: शांतीनगर - वास्को), मंजूनाथ हरीजन (वय २०, रा: शांतीनगर - वास्को), अमन मेमन (वय १९, रा: सासमोळे बायणा - वास्को), सुनिल हरीजन (वय १९, रा: बायणा - वास्को) व महम्मद रफीक (वय २१, बायणा - वास्को) यांचा समावेश असल्याची माहीती राणे यांनी दिली. गेल्या काही दिवसात दाबोळी विमानतळ, बोगमाळो, सांत्रे अशा विविध भागात उभ्या करून ठेवण्यात येत असलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनातील किंमती सामान चोरी होत असल्याची माहीती उघड होताच सदर प्रकरणात शामील असलेल्या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीसांनी सापळा रचला होता. १५ दिवसापासून ह्या चोरी प्रकरणातील चोरट्यांना जेरेबंद करण्यासाठी पोलीसांनी नजर ठेवल्यानंतर अटक करण्यात आलेले सदर युवक चारचाकी तसेच दुचाकी वाहनातील किंमती सामान चोरी करत असल्याचे पूर्णपणे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री त्यांना गजाआड करून अटक करण्यात आल्याचे सांगितले. चारचाकी व दुचाकीतील किंमती सामान ह्या टोळीकडून चोरण्यात येत असल्याची कबूली त्यांनी दिलेली असल्याची माहीती पोलीस निरीक्षक राणे यांनी देऊन अजून पर्यंत त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली असल्याचे सांगितले. पोलीसांनी जप्त केलेल्या सामानात १ लेपटॉप, १ आयफोन मोबाईल, ३ स्मार्ट मोबाईल, १ हातातील घड्याळ अशी सामग्री जप्त करण्यात आलेली असल्याचे राणे यांनी माहीतीत सांगितले. तसेच ज्या वाहनातून सामान चोरण्यात येत होते त्यांच्या मालकांची काही कागदपत्रे सुद्धा चोरीच्या वेळी लंपास करण्यात आलेली असून ती सुद्धा ह्या टोळीकडून सापडलेली आहे. सदर टोळीकडून जप्त करण्यात आलेली ३ लाख रुपयांची मालमत्ता दोन चोरी प्रकरणातील असून ह्या चोरीत लंपास केलेली रोक रक्कम मात्र सापडलेली नसल्याचे निरीक्षक राणे यांनी सांगितले. पोलीसांनी अटक केलेल्या ह्या पाच संशयित युवकांची टोळी मागच्या काही काळापासून विविध भागातील वाहनातून किंमती सामान चोरी करण्याचे काम करत असल्याचे तपासणीच्या वेळी उघड झालेले आहे. तपासणी वेळी संशयितांनी अन्य ठिकाण्यावरील वाहनातून केलेल्या किंमती सामानाच्या चोरीबाबतही काही माहीती उघड केली असल्याचे निरीक्षक राणे यांनी माहीतीत सांगून यात वास्को तसेच बाहेरील चोरी प्रकरणांचा सुद्धा समावेश असल्याचे सांगितले. नागरीकांनी आपली दुचाकी अथवा चारचाकी उभी करून ते काही कामासाठी निघून गेल्यानंतर ही टोळी सदर वाहनातून सामान लंपास करून पोबारा काढत असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. चारचाकीत काही किंमती सामान असल्याचे दिसून येताच वाहनाचा आरसा फोडून आत असलेले सामान सदर टोळी काढून घटनास्थळावरून लंपास व्हायचे. दुचाकीची ‘डीक्की’ उघडून त्यात असलेले सामान चोरटे लंपास करायचे असे तपासणीत स्पष्ट झालेले असल्याचे राणे यांनी सांगितले.
ह्या टोळीत अन्य काही संशयितांचा समावेश आहे काय याबाबतही पोलीस सध्या तपास करत असून सदर चोरट्यांचा एकूण किती प्रकरणात हात आहे याबाबतही बारकायीने तपास चालू आहे. ह्या टोळीत अन्य चोरट्यांचा हात असल्याचे सध्याच्या चौकशीत संकेत मिळत असल्याची माहीती राणे यांनी पुढे दिली. शुक्रवारी उशिरा रात्री अटक करण्यात आलेल्या सदर पाचही संशयितांना पोलीसांनी शनिवारी (दि.३१) सकाळी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधीक्षाने बजाविला. वास्को पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.