तुरी देऊन फरार चोरट्याच्या १६ दिवसानंतर पोलीसांनी पुन्हा मुसक्या आवळल्या
By पंकज शेट्ये | Published: May 15, 2023 04:47 PM2023-05-15T16:47:32+5:302023-05-15T16:47:41+5:30
तमिळनाडूनंतर बेळगाव आणि तेथून गोव्याला येत असल्याचे समजताच सापळा रचून गजाआड केला
वास्को: १६ दिवसापूर्वी वास्को पोलीसांच्या हाती तुरी देऊन फरार झालेल्या चोरट्याला पुन्हा गजाआड करण्यास वास्को पोलीसांना यश आले. २७ एप्रिलला चोरी प्रकरणातील आरोपी रवी सुभाराव याला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी गोमॅकॉ इस्पितळात नेला असता २८ एप्रिलच्या पहाटे त्यांने त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी पाठवलेल्या दोन पोलीस शिपायांच्या गाफीलपणाची संघी साधून तो फरार झाला होता. फरार आरोपी रवी सुभारावला पुन्हा गजाआड करण्यासाठी पोलीसांनी सर्वबाजूने चौकशीला सुरवात केल्यानंतर तो तमिळनाडू येथे असून नंतर बेळगावच्या मार्गाने गोव्यात येत असल्याचे उघड झाले. रवी सुभाराव पुन्हा गोव्यात येत असल्याचे पोलीसांना उघड झाल्यानंतर त्यांनी अचुक सापळा रचून रविवारी (दि.१४) त्याला चिखली परिसरातून अटक केली.
वास्को पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार २३ फेब्रुवारीला वास्कोत उभ्या करून ठेवलेल्या एका चारचाकीच्या दरवाजाची काच रवी सुभाराव यांने फोडून चारचाकीमधील अडीच लाखाची रक्कम घेऊन तो फरार झाला होता. त्या चोरी प्रकरणात पोलीसांनी भादस ३७९, ४२७ कलमाखाली गुन्हा नोंद करून पोलीस रवी सुभारावचा शोध घेत होते. ज्या व्यक्तीच्या चारचाकीतून पैसे चोरीला गेले होते त्याच्याच मदतीने २७ एप्रिल रोजी पोलीसांना चोरी प्रकरणातील आरोपी रवी सुभाराव याला अटक करण्यात यश प्राप्त झाले होते. अटक केलेल्या सुभारावला त्याच रात्री ७.३० च्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात पाठवले होते. तेथे ‘एक्स रे’ काढणे शक्य नसल्याने नंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पाठवले.
वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलेल्या रवी सुभाराव वर पाळत ठेवण्यासाठी वास्को पोलीस स्थानकावरील दोन पोलीस शिपायांना पाठवले होते. इस्पितळात रवी सुभारावची तपासणीची प्रक्रीया चालू असताना २८ एप्रिलच्या पहाटे ३ च्या सुमारास त्यांने त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी पाठवलेल्या दोन्ही पोलीस शिपायांच्या हाती तुरी देऊन तो फरार झाला. अटक केलेला आरोपी सुभाराव पोलीसांच्या ताब्यातून इस्पितळातून फरार झाल्याची माहीती उघड होताच त्याचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी ‘लूक आउट नोटस’ जारी करून सर्व मार्गाने त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. तसेच पाळत ठेवण्यासाठी पाठवलेल्या त्या दोन पोलीस शिपायांच्या ताब्यातून सुभाराव फरार झाल्याने दक्षिण गोवा पोलीस अधिक्षकांनी कारवाई करीत दोन्ही पोलीस शिपायांना निलंबित केले होते.
रविवारी (दि.१४) रात्री अखेरीस पोलीसांच्या तावडीतून फरार झालेला आरोपी सुभाराव याला पुन्हा गजाआड करून अटक करण्यास वास्को पोलीसांना यश प्राप्त झाले. त्याबाबत अधिक माहीतीसाठी वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक यांना संपर्क केला असता रवी सुभाराव हा आरोपी फरार झाल्यानंतर त्याबाबत आगशी पोलीस स्थानकावर तक्रार नोंद करण्यात आली होती. सुभारावच्या पुन्हा मुसक्या आवळून त्याला अटक करण्यासाठी सर्वमार्गाने त्याचा शोध घेण्यात येत होता. तीन दिवसापूर्वी तो तमिळनाडू येथे असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक गणेश मातोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचे एक खास पथक तयार करून तमिळनाडूला पाठवले. ते पथक तमिळनाडूला पोचून तेथे त्याचा शोध चालू केला असता तो बेळगाव ला पोचल्याचे त्याच्या ‘लोकेशन’ वरून आढळून आले. त्यानंतर आणखीन एक पोलीसांचे पथक तयार करून त्याच्या लोकेशनवर बारकायीने नजर ठेवण्यात आली अशी माहीती निरीक्षक नायक यांनी दिली.
फरार आरोपी रवी सुभाराव बेळगावहून पुन्हा गोव्यात येत असल्याचे त्याच्या ‘लोकेशन’ वरून पोलीसांना कळताच त्याला गजाआड करण्यासाठी पोलीसांनी सापळा रचला. रविवारी रात्री रवी सुभाराव दाबोळीतील चिखली परिसरात पोचला असता तेथे त्याच्या पोलीसांनी मुसक्या आवळून अटक केली अशी माहीती नायक यांनी दिली. अटक केलेल्या रवी सुभाराव याला सोमवारी (दि.१५) न्यायालयात उपस्थित केला असता त्यास पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश बजावण्यात आल्याची माहीती नायक यांनी दिली. चारचाकीची काच फोडून अडीच लाखाची रक्कम चोरी केल्याप्रकरणात वास्को पोलीस सुभाराव याच्याशी चौकशी केल्यानंतर येणाºया दिवसात त्याला इस्पितळातून फरार झालेल्या प्रकरणात चौकशीसाठी आगशी पोलीसांच्या ताब्यात देणार आहेत. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.
पी. रमेश च्या नावाने फीरत होता रवी सुभाराव
चारचाकीतील अडीच लाखाची रक्कम चोरी केल्याप्रकरणी २७ एप्रिल रोजी पोलीसांनी अटक केलेल्या आणि नंतर तो फरार झालेल्या आरोपीचे नाव पी.रमेश असे असल्याचे पोलीस आणि इतरांना माहीत होते. फरार पी.रमेश ला रविवारी पुन्हा पोलीसांनी गजाआड करून चौकशीला सुरवात केली असता त्याचे नाव पी. रमेश नसून रवी सुभाराव असे असल्याचे उघड झाल्याची माहीती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. चोरी प्रकरणातील आरोपी रवी सुभाराव काही काळापासून पी. रमेश अशा खोट्या नावाने फीरत असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. पोलीस त्याबाबतही चौकशी करत असल्याचे नायक यांनी सांगितले.