आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:24 PM2021-09-24T12:24:33+5:302021-09-24T12:25:16+5:30
अटक करण्यात आलेल्या टोळीतील चार जण नागपूर येथील तर अन्य दोन राजस्थान व मध्यप्रदेशचे
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: गेल्या सहा दिवसांपासून दक्षिण गोव्यातील वाडे, वास्को येथील ‘सुशीला सी वींड कोंम्प्लेक्स’ च्या एका फ्लॅटमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या एका टोळीवर वास्को पोलिसांनी छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. गुरूवारी मध्यरात्रीनंतर केलेल्या त्या छाप्यात पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या सहा जणांना अटक केली असून, त्यापैंकी दोघेजण राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील आहेत तर चारजण नागपूर, महाराष्ट्र येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाडे, वास्को येथील ‘सुशीला सी वींड कोंम्प्लेक्स’ च्या एका फ्लॅटमध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेतला जात असल्याची खात्रीलायक माहिती पोलीसांना मिळताच त्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर तेथे छापा टाकला. त्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर शुक्रवारी (दि.२४) पहाटे ४ पर्यंत पोलीस तेथे कारवाई करत होते. पोलिसांनी छापा टाकून आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सहा जणांना अटक केली. सट्टा घेणाऱ्या प्रकरणात अटक केलेल्या त्या संशयितांची नावे विजय जट (वय २३, राजस्थान), प्रकाश सिंग (वय २९, मध्यप्रदेश), दिलीप कुरक्रेजा (वय ३१, नागपूर), गुल्शन कुमार टीकयानी (वय ३०, नागपूर), रोहित नंदानी (वय २४, नागपूर) आणि गिरीश लवाणी (२६, नागपूर) अशी असल्याची माहीती पोलिसांनी दिली.
तसेच छापा मारून पोलिसांनी त्या ठिकाण्यावरून सट्टा घेण्यासाठी वापरण्यात येत असलेले विविध मोबाईल, २ लॅपटॉप, संपर्क करण्यासाठी वापरण्यात येणारी दोन यंत्रणे, एक दूरध्वनी संच (टेलिव्हिजन सेट) आणि इतर सामग्री जप्त केली आहे. १९ सप्टेंबरपासून ही टोळी त्या फ्लॅटमधून होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेण्यासाठी कार्यरत असल्याचे चौकशीत उघड झाले आहेत. बेकायदेशीररित्या सट्टा घेणाऱ्या याप्रकरणात अन्य कोणाचा समावेश आहे काय, अजूनपर्यंत कितीचा सट्टा घेतला होता अशा विविध प्रकारच्या चौकशी पोलीस अटक केलेल्या त्या टोळीतील सदस्यांशी करत आहे. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात अधिक चौकशी चालू आहे.