वेदांताच्या कामगारांची मुख्य कार्यालयावर धडक : पीएफ व थकबाकी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 04:01 PM2023-11-20T16:01:42+5:302023-11-20T16:02:18+5:30
येत्या १० डिसेंबर पूर्वी उरलेली थकबाकी द्यावी अशी मागणी या कामगारांनी केली.
नारायण गावस, पणजी : कामावरुन काढून टाकलेल्या डिचाेली येथील वेदांता मायनिंग कंपनीच्या कामगारांनी आपला काही महिन्यांचा पगार तसेच इतर थकबाकी पूर्ण कराव्या या मागणीसाठी पणजी वेदांतच्या मुख्य कार्यालयावर घेराव घातला. खाणी बंद झाल्या या कामगारांना काढले पण त्यांची राहिलेली थकबाकी दिलेली नाही. त्यामुळे येत्या १० डिसेंबर पूर्वी उरलेली थकबाकी द्यावी अशी मागणी या कामगारांनी केली.
सुमारे १५० कामगारांना काढले गेले. हे ६ महिने कामगार घरी आहेत. पण कंपनीने अजून पीएफ दिलेला नाही तसेच काही महिन्यांचा पगार दिला नाही. कामावरुन काढले म्हणजे कंपनीने कामगारांची पूर्ण साेयी केली पाहीजे त्यांची थकबाकी दिली पाहिजे. पण या कंपन्यांचे अधिकारी कामगारांच्या मागण्या मनावर घेत नाहीत. आज कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला आल्यावर पाेलीसांना आणून अडवणूक केली आहे, असे या कामगारांनी सांगितले.
आज खाणी बंद झाल्या पण आम्ही गेली अनेक वर्षे काम केले आहे. आता सेझातून वेदांतात घेतात पण कामगार कायद्याने घेत नाही आमचे कामगार हक्क आम्हाला द्या. पण येथे सतावणूक केली जाते. आम्ही स्थानिक कामगार आहोत पण आमच्यावर अन्याय होत आहे. जर कामगारांना पीएफ दिला नाही तर आम्ही डिचाेलीत खाणी सुरु करु देणार नाही. १० डिसेंबर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही पुन्हा येणार असेही कामगारांनी सांगितले.