गोव्यात भाजीच्या उत्पादनात पाच पटींनी वाढ; भातशेतीच्या बियाणांना दुप्पट मागणी- बाबू कवळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:12 PM2020-10-16T17:12:52+5:302020-10-16T17:12:57+5:30
कृषी संचालक नेव्हिल आफोंसो तसेच प्रकल्प अधिकारी चंद्रहास देसाई हेही यावेळी उपस्थित होते.
मडगाव: गोव्यात शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टीकोन बदलत आहे. यंदा राज्यातील भाजीच्या उत्पादनात पाच पटीने वाढ झाली आहे अशी माहिती कृषी खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले.
जागतिक अन्न दिवसानिमित्त मडगाव येथील कृषी कार्यालयात आयोजित केलेल्या खाद्यपदार्थ प्रदर्शनाचे यावेळी त्यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांच्या हस्ते कार्यालयाच्या बाहेर बाणावली जातीच्या नारळाच्या कवाथ्याचे रोपणही करण्यात आले. कृषी संचालक नेव्हिल आफोंसो तसेच प्रकल्प अधिकारी चंद्रहास देसाई हेही यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कवळेकर म्हणाले, यावेळी कृषी खात्याकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या भाज्यांच्या बियाणांची विक्री पाचपट वाढली तर भातशेतीचे बियाणे दुप्पट विकले गेले. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ज्या विविध योजना मार्गी लावल्या त्याचेच हे फलित असल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची आबाळ होऊ नये यासाठी कृषी कार्यालये बंद न ठेवता सेवा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात सध्या कमी होत असलेल्या नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात यावे यासाठी खास बियाणे कृषी खात्याने तयार केले असून हा शेतमाल कृषी खातेच विकत घेते अशी माहिती त्यांनी दिली. यंदा पाऊस चांगला झाल्याने भात पीक चांगले झाले असून परतीच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांची पिके कुजून गेली ही गोष्ट जरी खरी असली तरी त्यांना लगेच त्याची नुकसान भरपाई दिली जाईल असे कवळेकर यांनी सांगितले.