1 सप्टेंबरपासून प्रवेशबंदी न उठविल्यास गोव्यात जाणारी वाहने अडविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 03:50 PM2020-08-29T15:50:34+5:302020-08-29T15:50:45+5:30
1 सप्टेंबरपासून निर्बंध काढले गेले नाहीत तर कर्नाटकातून गोव्यात येणारी आणि गोव्यातून कर्नाटकात जाणारी सर्व वाहने अडविली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
काणकोण: कर्नाटक राज्यातून गोव्यात येणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही सक्तीविना प्रवेश करू द्यावा, अशी मागणी घेऊन शनिवारी कारवारच्या सुमारे 200 नागरिकांनी पोळे चेकनाक्यावर निदर्शने केली. 1 सप्टेंबरपासून निर्बंध काढले गेले नाहीत तर कर्नाटकातून गोव्यात येणारी आणि गोव्यातून कर्नाटकात जाणारी सर्व वाहने अडविली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
सध्या कारवारहून गोव्यात येणाऱ्यांना पोळे चेक नाक्यावर एक तर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र द्यावे लागते किंव्हा दोन हजार रुपये भरून स्वतः ची चाचणी करून घ्यावी लागते. तिसरा पर्याय म्हणजे चाचणी न करता गोव्यात येऊन 14 दिवस विलग अवस्थेत राहावे लागते. या उलट गोव्यातून कारवारला जाण्यासाठी कुठलेही निर्बंध नाहीत.
हे सर्व निर्बंध काढून टाका अशी या नागरिकांची मगणी असून हे निर्बंध न काढल्यास गोव्यात अत्यावश्यक वस्तू घेऊन येणारी वाहनेही अडवून धरू. 5 सप्टेंबरनंतर आम्ही हे आंदोलन सुरू करू असा इशारा कारवार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रघु नाईक यांनी दिली. सध्या गोव्यात सुमारे 30 हजार कारवारचे नागरिक स्थाईक झालेले असून रोज गोव्यात नोकरीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण सुमारे 1 हजारच्या आसपास आहे. या निर्बंधामुळे कित्येकांना नोकरी करण्यासठी गोव्यात येता येत नाही असे ते म्हणाले. आंतरराज्य वाहतुकीवरील सर्व निर्बंध केंद्र सरकारने काढलेले असताना गोव्यातच प्रवेश करण्यासाठी असे निर्बंध का, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान या प्रश्नांत आता कारवारच्या भाजप आमदार रुपाली नाईक यांनी लक्ष घातले असून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आपण बोलले असल्याचे त्यांनी सांगितले. 1 सप्टेंबरपासून हे सर्व निर्बंध उठविले जातील असे आश्वासन सावंत यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.