माविनवर कारवाईप्रश्नी दोन दिवसांत निर्णय
By admin | Published: February 21, 2015 02:19 AM2015-02-21T02:19:03+5:302015-02-21T02:19:14+5:30
मडगाव : दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्यावर आता काँग्रेस पक्षातर्फे कारवाई अटळ आहे. गुदिन्हो यांच्या पक्षविरोधी कारवाया वाढल्या असून,
मडगाव : दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्यावर आता काँग्रेस पक्षातर्फे कारवाई अटळ आहे. गुदिन्हो यांच्या पक्षविरोधी कारवाया वाढल्या असून, त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत व त्यानंतर कुठल्याही क्षणी प्रदेश काँग्रेस समिती त्याबाबत निर्णय घेऊन तो पुढील सोपस्कारासाठी हायकमांडकडे पाठवून देणार आहे. काल मडगावात दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुदिन्हो यांच्यावरील कारवाईबद्दल सुतोवाच केले.
एका कार्यक्रमात गुदिन्हो यांनी आपला पाठिंबा भाजपाला असल्याचे सांगितल्याचे वृत्त दूरचित्रवाणीवरून बघितले. दाबोळीतून ते स्वबळावर निवडून आले नव्हते तर काँग्रेसचे उमेदवार म्हणून मतदारांनी त्यांना मते दिली होती. जिंकून आल्यानंतर आतापर्यंत गुदिन्हो हे भाजपाशी जवळीक साधून आहेत. त्यामागील गुपितही उघड आहे. वीज घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरुध्द सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. हे प्रकरण आपल्यावर शेकू नये म्हणून आपली कातडी वाचविण्यासाठी गुदिन्हो हे स्वार्थी राजकारण खेळत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस ज्यो डायस तसेच दक्षिण गोवा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष मिनिनो फर्नांडिस यांनी संयुक्तपणे केला. एकेकाळी राजीव गांधी हे आपले राजकीय गुरू असल्याचे गुदिन्हो सांगत होते; आज मात्र ते या पक्षाशी फटकून वागत आहे. काँग्रेसमध्ये राहायचे नसेल तर खुशाल जा, असे या दोघांनी त्यांना बजावले आहे.
मोन्सेरात यांनी उघड उघड पक्षाविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना पक्षातून काढण्यासंबंधी निणर्य घेण्यात आला असून, लवकरच त्याची कार्यवाही होईल. मात्र, माविन गुदिन्हो यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली नव्हती, त्यामुळे कारवाईला थोडा वेळ लागला, असे फर्नांडिस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)